नेपाळमधून दहशतवादी घुसखोरी म्हणून बिहार सीमेवर उच्च सतर्क
वृत्तसंस्था/ पाटणा
पाकिस्तान आणि बांगलादेशमधील 10 हून अधिक संशयित दहशतवादी नेपाळ-ठाकुरगंजमार्गे बिहारमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर विभागाला प्राप्त झाली आहे. घुसखोरीच्या तयारीत असलेले हे दहशतवादी जमात-उल-मुजाहिदीन बांगलादेश, हरकत-उल जिहाद अल-इस्लामी आणि बांगलादेश जमात-ए-इस्लामी सारख्या कट्टरपंथी इस्लामिक संघटनांशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. या माहितीनंतर बिहार-नेपाळ सीमेवरील सुरक्षा व्यवस्था आता अधिक कडक करण्यात आली आहे. सीमा सुरक्षा दल आणि स्थानिक पोलिसांनी सुपौल, सीतामढी, अररिया आणि किशनगंज सारख्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये पाळत वाढवली आहे.
गुप्तचर माहितीच्या आधारे सुपौल जिह्याला लागून असलेल्या नेपाळ सीमेवर सुरक्षा दलांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. एसएसबी आणि बिहार पोलिसांनी संयुक्तपणे विशेषत: वीरपूर, निर्मली आणि कोशी नदीच्या किनारपट्टी भागात गस्त वाढवली आहे. सुपौलचे पोलीस अधीक्षक शैशव यादव यांनी नुकतीच भीमनगर पोलीस ठाण्याला भेट देत रात्रीच्या गस्तीसह सखोल देखरेखीचे निर्देश दिले. किशनगंजमध्येही 15 किमीच्या परिघात आधार पडताळणी, फिंगरप्रिंटिंग आणि रेटिना स्कॅन सारखी पावले उचलली जात आहेत. बिहार-नेपाळ सीमेवर रात्री 8 ते सकाळी 8 वाजेपर्यंत कर्फ्यू लागू असून तो पुढील दोन महिने राहणार आहे. या काळात, स्थानिक लोकांना सतर्क राहण्याचे आणि कोणत्याही संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित कळवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. एसएसबी आणि पोलिसांच्या संयुक्त पथके सीमेवरील प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. परंतु खुल्या सीमेमुळे आणि स्थानिक मदतीमुळे घुसखोरीची शक्यता अजूनही कायम आहे.
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाकिस्तान तणावात वाढ झाल्यामुळे सर्वच सीमांवर सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. 7 मे रोजी भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवाद्यांच्या अ•dयांवर हल्ला केला होता. याचदरम्यान बिहारची नेपाळशी असलेली 729 किमी लांबीच्या सीमेलाही संवेदनशील जाहीर करण्यात आले आहे. नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी आपली भूमी भारताविरुद्ध वापरली जाणार नाही, असे आश्वासन दिले होते. परंतु गुप्तचर अहवालांनुसार आयएसआय आणि बांगलादेशी संघटना नेपाळमधून घुसखोरीचा कट रचत आहेत.
Comments are closed.