संपूर्ण जगासमोर पाकिस्तान उघडकीस येईल.
विदेशी जाणाऱ्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर, सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदे यांच्यासह सात जणांची नावे
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि दहशतवादाला चोख प्रत्युत्तर दिले होते. या हल्ल्यापासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती कायम आहे. आता या घटनेचे सत्य जगासमोर आणण्यासाठी सरकारने सात सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ संयुक्त राष्ट्रांमध्ये पाठवण्याची घोषणा केली आहे. या गटात वेगवेगळ्या पक्षांचे खासदार सहभागी असून शशी थरूर, सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदे यांचाही समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील दोन खासदारांचा समावेश शिष्टमंडळात आहे. हे शिष्टमंडळ 21 ते 24 मे दरम्यान विदेशात निघण्याची शक्यता आहे. हा दौरा 10 दिवस चालण्याची अपेक्षा आहे.
भारताच्या दहशतवादाविरुद्धच्या सुरू असलेल्या युद्धात ऑपरेशन सिंदूर हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. यासंदर्भात, भारतातील सात सदस्यांचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्यांसह प्रमुख भागीदार देशांना भेट देणार आहे. परदेशात भारताची बाजू मांडण्यासाठी मोदी सरकारने सात खासदारांचे एक शिष्टमंडळ तयार केले आहे. शशी थरूर यांच्याशिवाय भाजपचे रविशंकर प्रसाद, जेडीयूचे खासदार संजय झा, भाजपचे खासदार बैजयंत पांडा, द्रमुकच्या खासदार कनिमोझी करुणानिधी, राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे आणि शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावांचा समावेश आहे.
भारताचे हे शिष्टमंडळ वेगवेगळ्या देशांना भेट देत पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशतवादाला पोसण्यासाठी आपले विचार मांडेल. तसेच भारताच्या ऑपरेशन सिंदूरबद्दल माहिती देईल. भारत पाकिस्तानच्या दहशतवादामुळे कसा त्रस्त आहे आणि ऑपरेशन सिंदूर सारख्या कृती करण्यास त्याला भाग पाडले गेले हेसुद्धा जगाला पटवून दिले जाईल. या माध्यमातून भारताच्या दहशतवादाविरुद्धच्या शून्य सहनशीलतेच्या धोरणाबद्दल जगाला एक मजबूत संदेश पोहोचणार आहे.
देशांची नावेही निश्चित
सर्वपक्षीय शिष्टमंडळ अमेरिका, ब्रिटन, युएई, दक्षिण आफ्रिका, जपान आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या इतर सदस्य देशांना भेट देतील. केंद्र सरकार पहिल्यांदाच अशाप्रकारे अनेक पक्षांच्या खासदारांना परदेश दौऱ्यावर पाठवत आहे. विदेशातील भेटीमध्ये भारतीय खासदार पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणतील. काश्मीरबाबत भारताची भूमिका स्पष्ट करणे तसेच सीमावर्ती दहशतवाद आणि पाकिस्तानची दहशतवादी भूमिका अधोरेखित करणे हा त्याचा उद्देश आहे.
राजनयिक अधिकाऱ्यांचाही समावेश
शिष्टमंडळामध्ये संसदेच्या खासदारांसह वरिष्ठ राजनयिक अधिकाऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. हे राजदूत अमेरिका, ब्रिटन, रशिया, जपान, युरोपियन युनियन, दक्षिण आफ्रिका आणि आखाती देशांमध्ये त्यांचे मुद्दे मांडण्यास मदत करतील. या यादीत फ्रान्समधील माजी भारतीय राजदूत जावेद अशरफ आणि मोहन कुमार, माजी परराष्ट्र सचिव एच. व्ही. श्रुंगला तसेच जपानमधील माजी राजदूत सुजन चिनॉय यांचा समावेश आहे.
निवड प्रक्रियाही सरकारकडून स्पष्ट
सरकारच्या म्हणण्यानुसार, शिष्टमंडळात विविध पक्षांचे संसद सदस्य, प्रमुख राजकीय व्यक्तिमत्त्वे आणि प्रख्यात राजनयिकांचा समावेश आहे. यापूर्वी, सरकारने विविध राजकीय पक्षांच्या शिष्टमंडळातील सदस्यांची नावे मागितली होती. या क्रमाने काँग्रेसकडूनही नावे मागवण्यात आली. यानंतर सरकारनेही आपल्याकडून नावे निवडली आहेत. या शिष्टमंडळात विविध राजकीय पक्षांचे सदस्य तसेच प्रमुख राजकीय व्यक्ती आणि प्रख्यात राजनयिकांचा समावेश असेल, असे सरकारने आधीच स्पष्ट केले आहे. अशा परिस्थितीत, राजकीय पक्षांच्या प्रस्तावांव्यतिरिक्त इतर नावेदेखील यादीत आहेत. शशी थरूर हे असेच एक नाव असून ते पक्षाच्या बाजूने नाही तर सरकारच्या बाजूने शिष्टमंडळाचा भाग आहेत.
तृणमूल काँग्रेसच्या खासदाराकडून नकार
तृणमूल काँग्रेसचे खासदार सुदीप बंदोपाध्याय यांनी आरोग्याच्या कारणास्तव शिष्टमंडळात समाविष्ट होण्यास नकार दिला आहे. त्यांनी स्वत: सामील न होण्याचे कारण स्पष्ट केले आहे. सरकारच्या वतीने किरेन रिजिजू यांनी मला फोन करून अमेरिकेला जाण्यास सांगितले होते. पण मी त्यांना आरोग्याच्या कारणास्तव मी या शिष्टमंडळात सामील होऊ शकणार नाही, असे सांगितल्याने बंदोपाध्याय यांनी स्पष्ट केले.
Comments are closed.