भारताने सामना 1 वि 7 जिंकला.

पहलगाम हल्ल्याला सूड घेण्यासाठी भारताने 7 मे या दिवशी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या 9 महत्वाच्या तळांवर जोरदार क्षेपणास्त्र आणि बाँब हल्ले चढवून ते तळ नष्ट केल्यानंतर पाकिस्तानने भारतावर ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रांचा हल्ला करण्याचा प्रयत्न केला ही बाब सर्वश्रुत आहे. तथापि, भारतावर हल्ला करणाऱ्यांमध्ये केवळ पाकिस्तानचा समावेश नव्हता. तर पाकिस्तानप्रमाणे आणखी सहा देशांनी भारतावर ‘सायबर क्षेपणास्त्रे’ टाकून भारताची युद्धयंत्रणा उद्ध्वस्त करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, असे उघड झाले आहे. हे सहा चीन, तुर्किये, अझरबैजान, बांगलादेश, मलेशिया आणि इंडोनेशिया हे आहेत, याशिवाय पाकिस्तानच्या हॅकर्सकडून सायबर हल्ले होतच होते.

तथापि, भारताने या सातही देशांचे सायबर हल्ले परतवून लावत या सर्व देशांवर एकाच वेळी ‘सायबर विजय’ मिळविला आहे. विशेषत: चीनच्या हॅकर्सनी भारताची अर्थव्यवस्था ‘खिळखिळी’ करण्याचा प्रयत्न केला. चीनकडून विविध मार्गांनी सातत्याने सायबर हल्ले भारताच्या संगणक जाळ्यांवर होत राहिले. तथापि, त्यांनी कोणताही धोका करण्याआधीच भारताच्या सजग आणि सज्ज सायबर यंत्रणेने हे हल्ले उध्वस्त करत भारताच्या विजयात आपलाही शानदार सहभाग नोंद केला.

भारताची आर्थिक क्षेत्रेही लक्ष्य

पाकिस्तानसह या सात देशांनी भारताची आर्थिक क्षेत्रे लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. वीजनिर्मिती केंद्रे, पोलादनिर्मिती केंद्र आणि संरक्षणसामग्री निर्मिती केंद्रांच्या वेबसाईटस् करप्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. भारतीय रेल्वे, नागरी विमानसेवा, दूरसंचार व्यवस्था आणि बीएसएनएल, युपीआय, डिजिटल वॅलेटस्, भारतातील शेअरबाजार असेच पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात मोठी गुंतवणूक करणाऱ्या कंपन्या आणि वित्तसंस्था अशा विविध आस्थापनांच्या संगणक यंत्रणांना लक्ष्य करण्यात आले. लक्षावधी हल्ल्यांच्या लाटाच्या लाटा भारताच्या संगणक व्यवस्थेवर कोसळत होत्या, अशी माहिती विविध आस्थापनांनी दिली आहे.

भारताची सायबरसुरक्षा भक्कम

प्रत्यक्ष रणभूमीवर संघर्ष होत असताना हे सायबरयुद्धही शिगेला पोहचले होते. ही जणू भारताच्या सायबर सुरक्षा व्यवस्थेची अग्नीपरीक्षाच होती. पण भारताने या हल्ल्याच्या शक्यतेचाही विचार आधीपासून करुनच पाकिस्तानला धडा शिकविण्याची योजना सज्ज केली होती. त्यामुळे यांपैकी प्रत्येक हल्ला परतवून लागण्यात आला. ऐन संघर्षकाळात भारताची कोणतीही यंत्रणा यामुळे थांबली किंवा थबकलीही नाही. विशेषत: संरक्षण यंत्रणांच्या संगणकीय जाळ्यांवर आणि शस्त्रास्त्रांशी संबंधित संगणकीय यंत्रणेपर्यंत हे हल्ले पोहचू देण्यात आले नाहीत. त्यामुळे या सर्व सात देशांमधील हॅकर्सचा प्रयत्न अक्षरश: वाया गेले आहेत.

याही युद्धात भारताचाच विजय

भारत आणि पाकिस्तान यांच्यात जो सशस्त्र संघर्ष झाला, याला युद्ध म्हणता येणार नाही. पण त्याचवेळी पाकिस्तान आणि त्याच्या सहा मित्र देशांकडून जे सायबर हल्ले होत होते, ते युद्धासारखेच होते. त्यामुळे ते एक सायबर युद्धच होते, असे अनेक तज्ञांनी स्पष्ट केले आहे. मात्र, भारत या सर्व सात देशांना या युद्धातही पुरुन उरला, असे दिसून येते. यातून भारताचे केवळ रणकौशल्य नव्हे, तर सायबर कौशल्यही निर्विवादपणे सिद्ध झाले आहे. भारताने या क्षेत्रात एकाचवेळी सात देशांना दणका देऊन आपले वर्चस्व सिद्ध केले. भारताच्या सायबर वीरांनीही त्यांची या संघर्षातील भूमिका चोखपणे पार पाडली आहे.

Comments are closed.