हिंमत आहे खरं छापायची…, प्रकाशक शरद तांदळे यांनी सांगितला पुस्तकाच्या निर्मितीचा प्रवास

दै. ‘सामना’ आणि न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी न्यू ईराचे प्रकाशक शरद तांदळे यांनी प्रास्तविकात पुस्तकाच्या निमित्ताने संजय राऊत यांच्याशी ओळख होण्यापासून ते पुस्तकाच्या प्रकाशनापर्यंतचा प्रवास खुमासदार शैलीत उलगडला. हिंमत आहे का खरं छापायची, असा प्रश्न विचारून संजय राऊत यांनी त्यांच्या तुरुंगातील अनुभवांवर आधारलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनाचा प्रस्ताव आपल्यासमोर ठेवला. आपण आधीपासूनच राऊत सरांच्या लिखाणाचे चाहते आहोत. सौ दाऊद की एक राऊत की, हे किती खरे आहे हे त्यांना भेटल्यावर समजले. त्यांच्या लिखाणातील एकही धारदार शब्द त्यांनी वगळू दिला नाही. परंतु, जिथे गरज होती तिथे सुचविलेले बदल त्यांनी मान्य करत स्वीकारले, असे तांदळे म्हणाले.

पुस्तक इंग्रजी आणि हिंदीतही

पुस्तकाच्या तीन हजार प्रती एका दिवसात संपल्या. पुस्तकाच्या हिंदी आणि इंग्रजी आवृत्तीवर काम सुरू आहे. ते 80 टक्के पूर्ण झाले असून पुढील महिन्यात दिल्लीत त्यांचे प्रकाशन होईल, अशी माहिती तांदळे यांनी दिली.

हे नाटक सोमवारपर्यंतचे

पुस्तकाचे प्रकाशन 17 मे रोजी करण्याचे ठरले. परंतु, युद्धाचे ढग घोंघावू लागल्यानंतर आपण पुस्तक प्रकाशनाचा सोहळा पुढे ढकलायचा का, असा प्रश्न मी राऊत सरांना विचारला. त्यावर ते म्हणाले, हे नाटक फार तर सोमवारपर्यंत टिकेल. आणि तसेच झाले. – शरद तांदळे

Comments are closed.