दिल्लीत आपला मोठा धक्का बसला
15 नगरसेवकांचे राजीनामे : नवीन पक्षाची घोषणा
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2025 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 27 वर्षांनंतर शानदार पुनरागमन केल्यानंतर आम आदमी पक्षाच्या केजरीवाल सरकारला दिल्लीतील सत्ता गमवावी लागली. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा आम आदमी पक्षाला मोठा झटका बसला आहे. दिल्ली नगरपालिकेतील पक्षाच्या 15 नगरसेवकांनी राजीनामा दिल्यामुळे अरविंद केजरीवाल यांची डोकेदुखी वाढली आहे. सदर 15 नगरसेवकांनी राजीनामा देऊन नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे.
राजीनाम्याची घोषणा करताना नगरसेवकांनी आम आदमी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वावर महापालिका योग्यरित्या चालवू शकत नसल्याचा आरोप केला आहे. यासोबतच त्यांनी जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करू न शकल्यामुळे आम्ही पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे. नवीन पक्षाची घोषणा करताना नगरसेवकांनी आपल्या पक्षाचे नाव ‘इंद्रप्रस्थ विकास पार्टी’ असे असल्याचे सांगितले. एवढेच नाही तर त्यांनी पक्षप्रमुखाचे नावही जाहीर केले. मुकेश गोयल यांची पक्षप्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे.
आम्ही सर्व नगरसेवक 2022 मध्ये दिल्ली महानगरपालिकेत आम आदमी पक्षाच्या तिकिटावर निवडून आलो होतो, परंतु 2022 मध्ये दिल्ली महानगरपालिकेत सत्तेत येऊनही पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व दिल्ली महानगरपालिका सुरळीत चालवू शकले नाही. वरिष्ठ नेतृत्व आणि नगरपालिका नगरसेवकांमध्ये कोणताही समन्वय नसल्यामुळे पक्ष विरोधी पक्षात आला. जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करू न शकल्यामुळे आम्ही सर्व नगरसेवक पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहोत, असे आम आदमी पक्षातून राजीनामा दिलेल्या सर्व 15 नगरसेवकांनी सांगितले.
आपल्या नवीन पक्षाचे नाव इंद्रप्रस्थ विकास पक्ष असणार आहे. आम्ही सर्वजण मुकेश गोयल यांना आमच्या पक्षाचे नेते म्हणून स्वीकारतो, असेही नगरसेवकांनी जाहीर केले आहे. त्यानंतर हेमवंद गोयल यांच्या अध्यक्षतेखाली 13 नगरपालिका नगरसेवकांनी मुकेश गोयल यांची इंद्रप्रस्थ विकास पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. आम आदमी पक्षातून राजीनामा दिलेल्या नगरसेवकांमध्ये मुकेश गोयल, हिमानी जैन, देवेंद्र कुमार, राजेश कुमार लाडी, सुमन अनिल राणा आणि दिनेश भारद्वाज आदी दिग्गजांचा समावेश आहे.
Comments are closed.