पंजाब, बंगळुरू प्ले ऑफमध्ये दाखल, थरारक सामन्यात राजस्थानवर 10 धावांनी मात
पंजाब किंग्जने चुरशीच्या लढतीत राजस्थान रॉयल्सवर 10 धावांनी मात करीत आयपीएलच्या प्ले ऑफच्या दिशेने दमदार पूच केली होती. मात्र गुजरातने दिल्लीला नमवल्यानंतर पंजाबसह बंगळुरूचे प्ले ऑफ मधील स्थान पक्के झाले. नेहाल वढेरा व शशांक सिंग यांची दमदार अर्धशतके आणि त्यानंतर मोक्याच्या वेळी हरप्रीत ब्रार, मार्को यान्सन व अझमतुल्लाह ओमरझाई यांनी केलेली भन्नाट गोलंदाजी ही पंजाबच्या विजयाची प्रमुख वैशिष्टय़े ठरली.
राजस्थानची पॉवर खेळा फलंदाजी
पंजाब किंग्जकडून मिळालेल्या 220 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सला 7 बाद 209 धावांपर्यंतच मजल मारता आली. यशस्वी जैसवाल (50) व वैभव सूर्यवंशी (40) यांनी 4.5 षटकांत 76 धावांचा पाऊस पाडत राजस्थानला खणखणीत सलामी दिली. जैसवालने पहिल्याच षटकात 4 चौकार व एका षटकारांसह 22 धावांची लूट केली. मग वैभवनेही दुसऱ्या षटकात 16 धावा वसूल केल्या. पहिल्या 3 षटकातच राजस्थानने अर्धशतकी धावसंख्या ओलांडली. अखेर हरप्रीत ब्रारने वैभवला बार्टलेटकरवी झेलबाद करून ही जोडी पह्डली. 14 वर्षीय वैभवने 14 चेंडूंत 40 धावांची खेळी करताना 4 षटकार व तितकेच चौकार लगावले. दुसऱ्या बाजूने जयस्वालचा दांडपट्टा सुरूच होता. त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे राजस्थानने पॉवर प्लेच्या 6 षटकांत 89 धावांची लयलूट केली. आयपीएलमधील पॉवर प्लेमधील ही सर्वाधिक धावसंख्या ठरली. जयस्वालने 24 चेंडूंत आपले अर्धशतकही साजरे केले. त्याने 25 चेंडूंत 50 धावा करताना 9 चौकारांसह एक षटकार ठोकला. हरप्रीत ब्रारने जयस्वालला ओवेनकरवी झेलबाद करून पंजाबला मोठे यश मिळवून दिले. कर्णधार संजू सॅमसन 20 धावांवर बाद झाला.
ध्रुव ज्युरेल लढला पण..
मधल्या फळीतील ध्रुव जुरेलने 31 चेंडूंत 4 षटकार व 3 चैकारांसह 53 धावांची खेळी करीत एक वेळ पंजाबच्या तोंडचे पाणी पळविले होते, मात्र त्याला सिमरॉन हेटमायर (11), इम्पॅक्ट प्लेअर शिवम दुबे (नाबाद 7) व वानिंदू हसरंगा (0) यांची साथ न मिळाल्याने राजस्थानला दहाव्या पराभवाला सामोरे जावे लागले. पंजाबकडून हरप्रीत ब्रारने 3, तर माकाx जॅन्सेन व अझमतुल्लाह ओमरझाई यांनी 2-2 विकेट टिपले. राजस्थानचा संघ प्ले ऑफच्या शर्यतीतून आधीच बाद झालेला असला तरी गुणतक्त्यात रसातळाला राहू नये यासाठी राजस्थान विजयासाठी प्रयत्नांची शिकस्त केली, पण त्यात त्यांना अपयश आले.
पंजाबची आघाडीची फळी अपयशी
दरम्यान पंजाब किंग्जने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 219 धावसंख्या उभारली. प्रियांश आर्य (9), त्याच्या जागेवर आलेला मिचेल ओवेन (0) व दुसरा सलामीवीर प्रभसिमरन सिंग (21) ही सलामीची जोडी अपयशी ठरली. प्रभसिमरनने 10 चेंडूंत 3 चौकार व एका षटकारासह 21 धावांची छोटेखानी, पण देखणी खेळी केली. हे तिघे फलंदाज लवकर बाद झाल्याने पंजाबची 3.1 षटकांत 3 बाद 34 अशी दुर्दशा झाली. तुषार देशपांडेने प्रियांश व प्रभसिमरन यांना बाद केले, तर क्वेना माफकाने ओवेनला यष्टीमागे सॅमसनकरवी झेलबाद केले.
नेहल, शशांक यांची दणकेबाज अर्धशतके
आघाडीच्या फळीने निराशा केल्यानंतर मधल्या फळीने जोरदार हल्लाबोल करीत पंजाबच्या डावाला आकार दिला. नेहाल वढेरा (70) व कर्णधार श्रेयस अय्यर (30) यांनी चौथ्या विकेटसाठी 44 चेंडूंत 67 धावांची भागीदारी करीत धावफलकावर शतक झळकाविले. 25 चेंडूंत 5 चौकारांसह 30 धावा करून श्रेयस बाद झाला. रियान परागने त्याला जैयस्वालकरवी झेलबाद केले. त्यानंतर वढेरा आणि आलेला शशांक सिंग यांनी दणकेबाज अर्धशतके झळकावित पंजाबला दोनशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. या दोघांनी 33 चेंडूंत 58 धावांची भागीदारी केली. अक्षय मधवालने 16 व्या षटकात नेहालला बाद करीत ही जोडी पह्डली. नेहालने 37 चेंडूंत 70 धावा फटकाविताना 5 षटकार व तितकेच चौकार ठोकले. त्यानंतर अझमतुल्लाह ओमरझाईने शशांकला तोलामोलाची साथ देत पंजाबला 219 धावसंख्येपर्यंत पोहोचविले. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 24 चेंडूंत 60 धावांची अभेद्य भागीदारी केली. शशांकने 30 चेंडूंत 5 चौकार व 3 षटकारांसह नाबाद 59 धावांची खेळी सजविली, तर अझमतुल्लाहने केवळ 9 चेंडूंत 3 चौकार व एका षटकारासह नाबाद 21 धावा फटकाविल्या. राजस्थानकडून तुषार देशपांडेने 2, तर क्वेना माफका, रियान पराग व आकाश मधवाल यांनी प्रत्येकी एक विकेट टिपला.
Comments are closed.