…अन् रोहित ‘हिटमॅन’ झाला

हिंदुस्थानचा कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्माला मधल्या फळीत खेळायचा कंटाळा यायचा, म्हणून 2019 मध्ये त्याला सलामीला पाठवण्याचा मी निर्णय घेतला आणि तो हिंदुस्थानी संघाचा हिटमॅन झाल्याचा खुलासा हिंदुस्थानी संघाचा माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केला. हाच निर्णय रोहितच्या कसोटी कारकीर्दीचा टार्निंग पॉइंट ठरला.

रवी शास्त्री हे 2017 ते 2021 सालादरम्यान हिंदुस्थानी संघाचे प्रशिक्षक होते आणि या चार वर्षांच्या कार्यकाळादरम्यान रोहित हिंदुस्थानी संघाचा सलामीवीर म्हणून यशस्वी ठरला.

रवी शास्त्रीने आयसीसी रिव्यूमध्ये आपल्या प्रशिक्षक कारकीर्दीत काही महत्त्वाचे टप्पे मांडताना त्यात रोहितच्या कारकीर्दीला वळण देणाऱ्या सलामीचीही आठवण ताजी केली. वन डे क्रिकेटमध्ये अभूतपूर्व यशस्वी ठरत असलेला रोहित कसोटीत का अपयशी ठरतोय, याबाबत मला अनेकदा प्रश्न पडायचे. त्याचा कसोटीचा खेळ पाहताना वारंवार जाणवायचे की चार, पाच क्रमांकावर फलंदाजी करताना तो इतका कंटाळायचा की त्याला धावाच होत नसायच्या. म्हणूनच मी त्याच्या फलंदाजीचा क्रम बदलण्याचा प्रयोग केला आणि तो यशस्वी ठरला. त्याला मैदानात लवकर उतरायला नेहमी आवडायचे. हेच मी हेरले. जर त्याला सलामीलाच पॅड बांधून मैदानात उतरवले तर त्याच्याकडे वेगवान गोलंदाजांना खेळायला आणि फटके निवडायला चांगला वेळ मिळेल. वन डेप्रमाणे कसोटीतही ओपनिंग त्याची वाट पाहत होती. त्याने हे स्वीकारले तर त्याच्या कारकीर्दीला योग्य दिशा मिळेल, याचा मला विश्वास होता. मी त्याला विचारले आणि त्यानेही बॅट उचलली आणि तो सलामीला उतरल्याचे शास्त्राr यांनी सांगितले.

रोहितने गेल्याच आठवडय़ात कसोटी क्रिकेटला निरोप दिला होता. त्याची कसोटी कारकीर्द फार बहरली नसली तरी त्याने 12 शतकांसह 4301 धावा केल्या आहेत. पुढे शास्त्री म्हणाले. 2019 च्या वर्ल्ड कपनंतरच रोहितला सलामीला पाठवण्याचा निर्णय झाला. 2019 चे वर्ल्ड कप रोहितसाठी अभूतपूर्व होते. याच  वर्ल्ड कपमध्ये त्याने 5 शतके ठोकत स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या होत्या. तसेच तत्कालीन कर्णधार विराट कोहलीबरोबर कसोटीत सलामीला रोहितला पाठवण्याचा प्रयोग आम्ही करणार होतो. तसा विचारही झाला होता. रोहितला सलामीला लवकरच यश लाभले. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आपल्या पहिल्या कसोटीतच दोन शतकी खेळी केल्या. विशेष म्हणजे रोहितने ठोकलेल्या 12 शतकांपैकी 9 शतके सलामीला येऊन केली असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

Comments are closed.