युद्धबंदीसाठी कोणतीही शेवटची तारीख नाही!

भारतीय लष्कराकडून स्पष्टोक्ती : विविध चर्चांना पूर्णविराम

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

12 मे रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधीबाबत झालेला करार कायम राहील, असे स्पष्ट करत भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी शस्त्रसंधी तात्पुरती असल्याचा दावा फेटाळून लावला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधी रविवार, 18 मे रोजी संपेल अशी अटकळ लष्करी अधिकाऱ्यांनी नाकारली आहे. डीजीएमओ चर्चेदरम्यान ठरलेल्या शस्त्रसंधीच्या समाप्तीचा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर कोणतीही समाप्ती तारीख नसल्याचे सांगण्यात आले. तसेच रविवारी भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओंमध्ये कोणतीही चर्चा होणार नाही, असेही अधिकाऱ्याने सांगितले.

रविवारी भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालक (डीजीएमओ) यांच्यात कोणतीही चर्चा झाली नाही. तसेच 12 मे रोजी डीजीएमओ चर्चेदरम्यान झालेल्या शस्त्रसंधीची कोणतीही मुदत संपण्याची तारीख नसल्याचेही लष्कराने स्पष्ट केले. भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधी 18 मे रोजी संपत असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिल्यानंतर हे विधान आले आहे.

यापूर्वी 12 मे रोजी भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओंमध्ये महत्त्वाची चर्चा झाली होती. यादरम्यान, दोन्ही बाजूंनी एकही गोळी झाडणार नाही किंवा कोणतीही आक्रमक कारवाई करणार नाही अशी वचनबद्धता कायम ठेवण्याशी संबंधित मुद्यांवर चर्चा झाली. तसेच सीमावर्ती भाग आणि आघाडीच्या भागातून सैन्याची संख्या कमी करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचा विचार दोन्ही बाजूंनी करावा यावरही चर्चा झाली.

पाकिस्तानच्या डीजीएमओंनी भारतीय समकक्ष लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना फोन केल्यानंतर 10 मे रोजी दोन्ही देशांनी गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याचे मान्य केले होते. त्यानंतर रविवार, 11 मे रोजी संयुक्त पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना लेफ्टनंट जनरल घई यांनी सर्वप्रथम पाकिस्तानी समकक्षांनी शनिवारी झालेल्या चर्चेदरम्यान संघर्ष संपवण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती दिली होती.

भारताने 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू केले होते. काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी अ•dयांवर हल्ला करण्यात आला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाल्यामुळे भारताने आक्रमक धोरण स्विकारले होते.

Comments are closed.