GT vs DC: गुजरातचा ‘हा’ खेळाडू ठरला दिल्लीसाठी कर्दनकाळ!

आयपीएल 2025 स्पर्धेमध्ये काल म्हणजेच 18 मे रोजी डबल हेडर सामने खेळण्यात आले. यातील दुसरा सामना दिल्ली विरुद्ध गुजरात टायटन्स संघामध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात गुजरातने दिल्लीचा 10 विकेट्सने पराभव केला आहे. दिल्लीने प्रथम फलंदाजी करत गुजरात टायटन्ससमोर विजयासाठी 200 धावांचे आव्हान ठेवले होते.

या धावांचा पाठलाग करताना साई सुदर्शनने गुजरातसाठी शानदार शतकी खेळी केली. गुजरात टायटन्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी 200 धावांचे आव्हान होते. दोन्ही संघांसाठी हा सामना अतिशय महत्वाचा होता. त्यामुळे इतका मोठ्या धावांचा डोंगर सर करण्याचा दबाव गुजरात टायटन्स संघावर होता. मात्र ज्या पद्धतीने गुजरातने फलंदाजी केली ते पाहून दिल्लीच्या गोलंदाजांना घाम फुटला.

गुजरात टायटन्सने आपल्याला रिटेन का केलं आहे, हे साई सुदर्शनने पहिल्या सामन्यापासून दाखवून दिलं आहे. साई सुदर्शन हा गुजरातच्या मजबूत फलंदाजीचा स्तंभ आहे. हा स्तंभ शेवटपर्यंत टिकून राहतो म्हणून गुजरातला कोणतंही आव्हान सहज पूर्ण करण्यात यश येत आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात गुजरातला 200 धावांचा पाठलाग करायचा होता. हे आव्हान छोटं नव्हतं. पण सुदर्शन शेवटपर्यंत उभा राहिला. त्याने 61 चेंडूत 12 चौकार आणि 4 षटकार झळकावत 108 धावांची खेळी केली.

गुजरातचा विजय टॉप 3 फलंदाजांच्या खांद्यावर होता. दिल्लीला या तिन्ही फलंदाजांना परत पाठवायचं होतं. मात्र दिल्लीचे गोलंदाज सलामी जोडीलाही बाद करू शकले नाहीत. दोघांनी मिळून 200 धावांची भागीदारी केली. यापूर्वी आयपीएलच्या इतिहासात असं कधीच घडलं नव्हतं. गुजरातच्या या विजयामुळे दिल्लीच्या अडचणी वाढल्या आहेत.

Comments are closed.