ठाण्यात तृतीयपंथीयांच्या हाती रिक्षाचे स्टिअरिंग; महिलांना मोफत ई-रिक्षाचे वाटप

पहिल्यांदाच ठाण्यात ई-रिक्षांचेदेखील पदार्पण झाले आहे. पुरुषाच्या पाठोपाठ महिलांनी रिक्षा व्यवसायात यशस्वी कामगिरी केल्यानंतर आता तृतीयपंथीयांनी रिक्षाचे स्टिअरिंग हाती घेतले आहे. ठाण्यातील महिलांना मोफत ई-रिक्षाचे वाटप रोटरी क्लब ऑफ लेक सिटी, समर्थ भारत व्यासपीठ यांच्या वतीने शनिवारी करण्यात आले. दरम्यान करिना आडे या महाराष्ट्रातील पहिल्या तृतीयपंथी महिला रिक्षाचालक ठरल्या आहेत.
पर्यावरण रक्षणासाठी सध्या इलेक्ट्रिक वाहनांची सद्दी सुरू झाली आहे. मात्र सर्वाधिक संख्येने असलेल्या रिक्षा या वाहन प्रकारात अजूनही ई-रिक्षा महाराष्ट्रात आल्या नव्हत्या. समर्थ भारत व्यासपीठ रोटरी क्लब ऑफ लेक सिटी आणि अॅटॉस इंडिया कंपनीच्या पुढाकाराने विधवा, परितक्त्या, तृतीयपंथी, कचरावेचक १५ महिलांना मोफत ई-रिक्षा देण्याचा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाचा भाग म्हणून आज ५ जणींना ई-रिक्षा सुपूर्द करण्यात आल्या. रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण, वाहन परवाना, बॅच व ई-रिक्षा मोफत देत समाजातील दुर्लक्षित व आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिलांच्या सक्षमीकरणासाठी मदत होणार आहे. सविता रणपिसे, रत्नावली जाधव, संगीता मांजरेकर, उज्ज्वला शिंदे या महिलांना मोफत रिक्षांचे वाटप करण्यात आले.
Comments are closed.