हैदराबादने केला लखनौचा गेम, हैदराबादच्या विजयामुळे लखनौचे आव्हान संपुष्टात

सामना नवांबांच्या लखनौत असूनही यजमान संघाच्या चेहऱ्यावर विजयी हास्य उमलू शकले नाही. आधीच स्पर्धेतून बाद झालेल्या हैदराबादने लखनौचा आयपीएलमधील खाना खराब करताना 206 धावांचे लक्ष्य 10 चेंडू आणि सहा विकेट राखून गाठले. हैदराबादच्या या विजयामुळे लखनौचे प्ले ऑफचे स्वप्न भंग झाले असून आता प्ले ऑफच्या चौथ्या स्थानासाठी मुंबई आणि दिल्ली यांच्यात संघर्ष असेल.

लखनौला प्ले ऑफमधील आपले आव्हान जिवंत ठेवण्यासाठी हैदराबादला नमवणे आवश्यक होते, पण ते अभिषेक शर्माच्या झंझावाताने अशक्य करून टाकले. सलीमीवीर अथर्व तायडे 13 धावांवर बाद झाल्यानंतर अभिषेकने षटकार-चौकारांची आतषबाजी करत सामन्यात हैदराबादला विजयी ट्रकवर आणले. त्याने 18 चेंडूंतच आपले अर्धशतक झळकावले. तो शतकाकडे झेपावत असताना दिग्वेश राठीने त्याची विकेट काढली आणि 20 चेंडूंत 59 धावांचा त्याचा झंझावात थांबला. या विकेटमुळे लखनौच्या जिवात जीव आला होता. पण पुढे इशान किशन (35) आणि हेन्रीक क्लासन (47) यांनी आपली झंझावाती खेळी करत हैदराबादचा विजय जवळजवळ निश्चित केला. कामिंदु मेंडिसनेही 21 चेंडूंत 32 धावा काढल्या. त्यामुळे हैदराबादने दहा चेंडूआधीच लक्ष्य गाठले. एकाना मैदानावर प्रथमच दोनशेपेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करण्यात आला. 59 धावा करणारा अभिषेक विजयाचा शिल्पकार ठरला.

मार्श-मार्करमची तुफानी सलामी

लखनौसाठी आजचा सामना जीवनमरणाचा होता. त्यांच्या सलामीच्या मिचेल मार्श आणि एडन मार्करम जोडीचा खेळ त्यालाच साजेसा होता. दोघांनी हैदराबादच्या गोलंदाजांना धू धू धुताना 10.3 षटकांत 115 धावांची तुफानी सलामी दिली. दोघांनी शतकी सलामीसह वैयक्तिक साठी गाठण्याचाही पराक्रम केला. मार्शने 39 चेंडूंच 4 षटकार आणि 6 चौकारांचा वर्षाव करताना 65 धावा केल्या. तोच पहिला बाद झाला.
त्यानंतर लखनौच्या डावाला नजरच लागली.

सलामीची जोडी फुटल्यानंतर आलेल्या ऋषभ पंतने आपल्या अपयशी खेळींच्या यादीत आणखी एका खेळीचा समावेश केला. तो अवघ्या 7 धावांवर बाद झाला. मग मार्करमही 61 धावांवर तंबूत परतला. त्याने निकोलस पूरनच्या साथीने 35 धावांची भर घातली. मग एकटय़ा निकोलसने हैदराबादच्या गोलंदाजीवर धावा काढल्या. त्याच्या 45 धावांमुळेच लखनौ 200 धावांचा टप्पा ओलांडू शकला.

Comments are closed.