युद्धविरामात ट्रम्पची कोणतीही भूमिका नाही!

परराष्ट्र सचिवांनी मांडले सत्य : शिष्टमंडळासमोर संसदीय समितीची बैठक

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी सोमवारी संसदीय समितीच्या बैठकीत ‘ऑपरेशन सिंदूर’बाबतच्या अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर दृष्टिक्षेप टाकला. पाकिस्तानसोबतच्या शस्त्रसंधीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कोणतीही भूमिका नाही. संघर्षविरामामध्ये कोणत्याही तिसऱ्या पक्षाची मध्यस्थी नव्हती. हा निर्णय द्विपक्षीय पातळीवर घेण्यात आला, असे विक्रम मिसरी म्हणाले. परराष्ट्र मंत्रालयाकडून सोमवारी संसदीय समितीला ‘ऑपरेशन सिंदूर’बद्दल माहिती देण्यात आली.

परराष्ट्र व्यवहारांवरील स्थायी संसदीय समितीची बैठक सोमवारी संसदेच्या अॅनेक्स इमारतीत झाली. बैठकीदरम्यान परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी आणि परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी संसदीय समितीमधील खासदारांना ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तानविरुद्ध केलेल्या कारवाईबद्दल माहिती दिली. भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदी पारंपारिक क्षेत्रातच आहे आणि पाकिस्तानकडून कोणतेही अण्वस्त्र हल्ल्याचे संकेत मिळालेले नाहीत, असे मिसरी यांनी समितीला सांगितले. याप्रसंगी बैठकीत उपस्थित असलेल्या काही खासदारांनी पाकिस्तानने संघर्षात चिनी व्यासपीठ वापरले होते का? अशी विचारणा केल्याचेही समजते. भारत-पाकिस्तान संबंधांची नाजूक स्थिती, लष्करी तयारी आणि राजनैतिक सावधगिरी राखण्याचे धोरणात्मक महत्त्व लक्षात घेता ही माहिती अधिक महत्त्वाची आहे.

संसदीय समितीच्या बैठकीला समितीचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे खासदार शशी थरूर, तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी, काँग्रेसचे राजीव शुक्ला आणि दीपेंद्र हुडा, एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार रविशंकर प्रसाद, सतनाम सिंग, नवीन जिंदाल, अपराजिता सारंगी, अरुण सिंग आणि आरपीएन सिंह उपस्थित होते. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी ऑपरेशन सिंदूर आणि 10 मे रोजी झालेल्या भारत-पाकिस्तान शस्त्रसंधी करारांतर्गत झालेल्या हवाई हल्ल्यांची संपूर्ण माहिती दिली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सीमेवर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक पार पडली.

केंद्र सरकारने 59 सदस्यांचे 7 शिष्टमंडळ (गट) जाहीर केले आहेत. त्यात 51 नेते आणि 8 राजदूतांचा समावेश आहे. त्यात एनडीएचे 31 आणि इतर पक्षांचे 20 सदस्य समाविष्ट आहेत. हे शिष्टमंडळ जगातील प्रमुख देशांना भेट देत ऑपरेशन सिंदूर आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाबद्दल भारताची भूमिका मांडणार आहेत.

अमेरिकेत विलंबाने जाणार : थरूर

पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी परदेशात जाणाऱ्या शिष्टमंडळांपैकी एकाचे नेतृत्व करणारे काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी आपल्या विदेश दौऱ्यावर भाष्य केले. 24 मे रोजी आम्ही रवाना होणार आहोत. सुरुवातीला गयाना, पनामा, कोलंबिया, ब्राझील आणि नंतर शेवटी अमेरिकेला जाणार आहोत, असे थरूर म्हणाले. अमेरिकेत मेमोरियल डे वीकेंड असल्याने आणि अमेरिकेत संसदेचे अधिवेशन 2 जूनपर्यंत असल्याने आमचे शिष्टमंडळ थोडे उशिरा निघत आहे. अमेरिकेत लवकर पोहोचण्यात काही अर्थ नाही. म्हणूनच आपण शेवटच्या टप्प्यात अमेरिकेत पोहोचणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अणुहल्ल्याचा धोका नाही!

भारत-पाकिस्तान संघर्ष पारंपरिक शस्त्रांपुरता मर्यादित राहिला असून पाकिस्तानकडून कोणत्याही अणुहल्ल्याचा धोका नाही, असेही परराष्ट्र सचिवांनी समितीला सांगितले. ‘1947 पासून पाकिस्तानशी आपले संबंध वाईट आहेत’ असे नमूद करतानाच मिसरी यांनी दोन्ही देशांच्या डीजीएमओंमध्ये सतत संपर्क असतो असे स्पष्ट केले. शिवाय, तुर्कीसोबतच्या संबंधांबद्दल बोलताना मिसरी यांनी ‘तुर्कीसोबत आमचे कधीही वाईट संबंध नव्हते, पण आम्ही कधीही जवळचे भागीदारही नव्हतो. तुर्कीसोबतच्या कोणत्याही संघर्षात व्यापाराचा उल्लेख नाही’ असेही स्पष्ट करण्यात आले.

संघर्षात चिनी शस्त्रs वापरली का?

भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्षात चिनी बनावटीची शस्त्रs वापरली गेली का? यावर परराष्ट्र सचिवांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले. ‘कोणी काय वापरले हे महत्त्वाचे नाही. आम्ही त्यांचे हवाई तळ उद्ध्वस्त केले, हेच महत्त्वाचे आहे, असे मिसरी म्हणाले. तसेच भारताने संघर्षात किती विमाने गमावली अशी विचारणा केली असता परराष्ट्र सचिवांनी हा सुरक्षेचा विषय असल्यामुळे त्याबद्दल सार्वजनिकरित्या काहीही बोलता येणार नाही, असे मिसरी म्हणाले.

या बैठकीत सायबर हल्ल्याचा तीव्र निषेध करणारा ठराव सोमवारी संसदीय स्थायी समितीने एकमताने मंजूर केला. समितीने हा सायबर हल्ला अस्वीकार्य आणि दुर्भावनापूर्ण असल्याचे म्हटले आहे.

Comments are closed.