शक्तिपीठ महामार्गाला शिवसेनेचा तीव्र विरोध, विनायक राऊतांचे सरकारला आव्हान

शक्तिपीठ महामार्गाच्या प्रस्तावित प्रकल्पाला शिवसेनेने तीव्र विरोध दर्शवला आहे. या महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या हजारो एकर जमिनींचे नुकसान होणार असून कोकणातील पर्यावरणाचा समतोल बिघडणार असल्याचा आरोप शिवसेना नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. तसेच या महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शक्तिपीठ महामार्ग सुमारे 800 किलोमीटर लांबीचा असून त्यासाठी 86 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या महामार्गामुळे शेतकऱ्यांची 27 हजार एकर शेतजमीन रस्त्याखाली जाणार आहे. तसेच, 300 फूट रुंदीच्या या महामार्गामुळे कोकणातील निसर्गाचे मोठे नुकसान होणार असल्याचा दावा विनायक राऊत यांनी केला आहे. सिंधुदुर्गातील बारा गावांनी या महामार्गाला विरोध दर्शवला असून शिवसेना पक्षाचे सर्व कार्यकर्ते या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, विधानसभा संपर्क प्रमुख रुपेश राऊळ, तालुकाप्रमुख मायकल डिसोझा, रमेश गावकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
आंदोलन मोडून दाखवा
शिवसेनेचे डॉ. जयेंद्र परुळेकर हे या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. शासनाचा हा डाव हाणून पाडण्यासाठी आम्ही रणांगणात उतरलो आहोत. हिंमत असेल तर धमकी देणाऱ्यांनी आमचे आंदोलन मोडून दाखवावे, असे आव्हान विनायक राऊत यांनी विरोधकांना केले आहे.
विकासाला विरोध नाही
शिवसेनेचा विकासाला विरोध नाही, पण विकासाच्या नावाखाली जमिनी हडपणाऱ्यांना शिवसेनेचा विरोध आहे. शेतकऱ्यांना नामशेष करणारा शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही. हिंमत असेल तर या आमच्या तंगडय़ा तोडायला, असे आव्हानही विनायक राऊत यांनी विरोधकांना केले.
Comments are closed.