रोमांचक सामन्यात युएईने बांगलादेशला चारली धूळ, शेवटच्या षटकात सामना जिंकून रचला इतिहास!

संयुक्त अरब अमिराती क्रिकेट संघाने सोमवारी (19 मे) बांगलादेशविरुद्धच्या टी20 सामन्यात 206 धावांचे लक्ष्य गाठत इतिहास रचला. शेवटच्या 12 चेंडूत युएईला विजयासाठी 29 धावांची आवश्यकता होती, तर 19व्या षटकात सामना फिरला ज्यामुळे युएईच्या विजयाच्या आशा उंचावल्या.

शेवटच्या षटकापर्यंत चाललेल्या या रोमांचक सामन्यात युएईला विजयासाठी 12 चेंडूत 29 धावांची आवश्यकता होती. बांगलादेशसाठी शरीफुल इस्माइलने 19 वे षटक टाकले, त्याने पहिल्याच चेंडूवर अलिशान शराफूला (13 धावा) बाद केले पण त्यानंतर 17 धावा दिल्या. हैदर अलीने त्याला 1 षटकार आणि 1 चौकार मारला, त्याआधी ध्रुव पराशरने 1 चौकार मारला.

शेवटच्या षटकात विजयासाठी 12 धावांची आवश्यकता होती, ध्रुवने दुसऱ्या चेंडूवर षटकार मारला आणि संघाची धावसंख्या 200च्या पुढे नेली. पण तिसऱ्या चेंडूवर तंजीम हसन शकिबने त्याला बाद करून सामन्याचा उत्साह वाढवला. चौथ्या चेंडूवर एक धाव घेतल्यानंतर, शाकिबने नो बॉल टाकला, ज्यामुळे खेळ बिघडला. पाचव्या चेंडूवर 2 धावा घेत, युएईने विजय निश्चित केला आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली.

शारजाह येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात, बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना 205 धावांचा डोंगर उभारला. तन्जीद हसनने 33 चेंडूत 59 धावा, कर्णधार लिटन दासने 32 चेंडूत 40 धावा आणि तौहीद हृदयॉयने 45 धावांची चांगली खेळी केली.

युएईसाठी लक्ष्याचा पाठलाग करताना, कर्णधार मुहम्मद वसीमने कर्णधारपदाची खेळी केली, त्याने 42 चेंडूत 5 षटकार आणि 9 चौकारांसह 82 धावांची दमदार खेळी केली. या खेळीसाठी त्याला सामन्याचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आले. त्याने जोहैब खानसोबत पहिल्या विकेटसाठी 107 धावांची भागीदारी केली, ज्यामुळे संघाला चांगली सुरुवात मिळाली.

युएई क्रिकेट संघाचा बांगलादेशविरुद्धचा हा पहिलाच टी-20 विजय आहे. (UAE creates history by winning match against Bangladesh) बांगलादेशने यापूर्वी खेळलेले तिन्ही सामने जिंकले होते. युएई आणि बांगलादेश यांच्यातील 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना 21 मे रोजी रात्री 8:30 वाजता शारजाह येथे खेळला जाईल.

Comments are closed.