हैदराबादचा बंगळुरूला धक्का, हैदराबादच्या विजयामुळे टॉप टूची चुरस वाढली

शेवटच्या चार षटकांत ईशान किशनने केलेल्या तुफान फटकेबाजीमुळे हैदराबादने उभारलेले 232 धावांचे आव्हान टॉपवर जाण्यासाठी धडपडणाऱ्या बंगळुरूला पेलवले नाही आणि हैदराबादने 42 धावांचा दणदणीत विजय मिळवला. बंगळुरूच्या पराभवामुळे टॉप टूची लढत आणखी चुरशीची झाली असून चारही संघांची आशा कायम आहे.

हैदराबादच्या 232 धावांचा पाठलाग करताना बंगळुरूच्या फिल सॉल्ट आणि विराट कोहलीने 7 षटकांत 80 धावांची जबरदस्त सलामी दिली. यंदाच्या मोसमात 7 अर्धशतके झळकवणाऱ्या विराटचे आठवे अर्धशतक 7 धावांनी हुकले. त्याने 25 चेंडूंत 43 धावा काढल्या. त्यानंतर सॉल्टने आपला अर्धशतकी टप्पा गाठला. मयंक अगरवालसह त्याने 40 धावांची भर घालत सामन्याचा थरार कायम ठेवला.

…अन् बंगळुरूच्या डावाला घसरण

रजत पाटीदार आणि जितेश शर्माने 44 धावांची भागी रचत बंगळुरूचा विजयी ट्रक कायम ठेवला; मात्र पाटीदार बाद होताच बंगळुरूच्या डावाला घसरण लागली. पॅट कमिन्सने झटपट 3 विकेट काढत बंगळुरूचा डाव 189 धावांतच संपवत हैदराबादच्या दणदणीत विजयावर शिक्कामोर्तब केले. 3 बाद 173 धावांवर असलेला बंगळुरूचे शेवटचे 7 फलंदाज 16 धावांत बाद झाले. येथेच बंगळुरूने सामना गमावला.

इशानच्या हुकचा ईशान

आज हैदराबादच्या डावाला अभिषेक शर्मा आणि ट्रव्हिस हेडने नेहमीप्रमाणे झंझावाती सलामी दिली. 4 षटकांत 56 धावांची सलामी ठोकल्यानंतर दोघेही 3 चेंडूंत बाद झाले. त्यानंतर आलेल्या ईशान किशनने डावाची सूत्रे आपल्या हाती घेत शेवटच्या चेंडूपर्यंत खेळ करत संघाला अनपेक्षितपणे 231 धावांपर्यंत नेले. त्याने 48 चेंडूंत 5 षटकार आणि 7 चौकारांची आतषबाजी करत 94 धावांचा पाऊस पाडला. विशेष म्हणजे, त्याने शेवटच्या 4 षटकांत तुफान फटकेबाजी करत 54 धावा काढत संघाची मजल 231 पर्यंत ताणली. त्याला यंदाच्या आयपीएलमधील दुसरे शतक ठोकण्याची संधी होती, पण ती थोडक्यात कमी पडली. त्याची हीच खेळी मॅचविनिंग ठरली.

Comments are closed.