तुर्की बनावटीच्या रोबोटिक वॉटर रेस्क्यू मशीनचे कंत्राट रद्द करा! शिवसेनेची मुंबई महापालिकेकडे मागणी

पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी पहलगाम हल्ला करून निरपराध 26 हिंदुस्थानींची हत्या घडवून आणली. जगभरातून याचा निषेध झाला आणि पाकिस्तानला यासाठी दोषी धरण्यात आले. मात्र तुर्कस्तानने या हल्ल्याचा साधा निषेधही केला नाही आणि पाकिस्तानला हिंदुस्थानविरोधात शस्त्रसामग्री पुरवली. हिंदुस्थानने तुर्पस्तानला धडा शिकवण्यासाठी त्यांच्या सर्व उत्पादनांवर बहिष्कार घातला आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेनेही मुंबईच्या सहा चौपाटय़ांवर तुर्की बनावटीच्या रोबोटिक वॉटर रेस्क्यू मशीनचे दिलेले कंत्राट तातडीने रद्द करावे, अशी मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थान- पाकिस्तान संघर्षादरम्यान तुर्कस्तानने पाकिस्तानला दिलेल्या समर्थनाच्या निषेधार्थ हिंदुस्थाननने तुर्कस्तानशी सर्व व्यापारी संबंध तोडून त्यांच्या सर्व उत्पादनावर बहिष्कार टाकण्याचा स्वागतार्ह निर्णय घेतला. त्यामुळे सर्वसामान्य हिंदुस्थानींनीही उत्स्फूर्तपणे तुर्कस्तानच्या सर्व उत्पादनांवर बहिष्कार टाकला आहे. मुंबई महापालिकेने एका हिंदुस्थानी कंपनीच्या माध्यमातून मुंबईतील सहा चौपाटय़ांवर बसवण्यात येणाऱ्या तुर्का बनावटीच्या रोबोटिक वॉटर रेस्क्यू मशीन तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदुस्थानने तुर्कीच्या सर्व उत्पादनांवर बहिष्कार टाकला असताना पालिकेने तुर्क बनावटीच्या रोबोटिक वॉटर रेस्क्यू मशीन तैनात करण्याचा घेतलेला निर्णय हा संतापजनक आहे. त्यामुळे पालिकेने हे कंत्राट रद्द करावे. नाही तर शिवसेनेकडून जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा सचिन पडवळ यांनी दिला आहे. दरम्यान, भाजपचे माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनीही पालिकेने हे कंत्राट रद्द करावे, अशी मागणी केली आहे.

Comments are closed.