धुळे विश्रामगृहातील 1 कोटी 84 लाखांचे प्रकरण दडपून टाकण्याचे गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटे

धुले रोख घोटाळा: धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या विधीमंडळाच्या अंदाज समितीतील आमदारांना पाच कोटींच्या वाटपासाठी पैसे आणण्यात आल्याचा गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटे (Anil Gote) यांनी केला होता. यानंतर गोटे यांनी ज्या खोलीत पैसे ठेवले होते त्या खोलीला कुलूप लावले होते. पोलिसांनी ती खोली उघडून तपासणी केली असता एक कोटी 84 लाख रुपये आढळून आले होते. तर ही खोली आमदार अर्जून खोतकर (Arjun Khotkar) यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या नावावर बुक करण्यात आली होती. या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गंभीर दखल घेतली. प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्याचे आदेश त्यांनी दिले. मात्र, मुख्यमंत्र्यांनी चौकशी समिती नेमण्याची घोषणा केल्यानंतर अनिल गोटे यांनी समितीवर अविश्वास व्यक्त केला होता. आता गोटे यांनी आता पुन्हा एकदा सनसनाटी आरोप केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

अनिल गोटेंचा सनसनाटी आरोप

धुळे शहरातील शासकीय गुलमोहर विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 मध्ये सापडलेल्या रोकड रकमेचे प्रकरण दडपून टाकण्याच्या उद्योगाकडे पोलिसांची वेगाने वाटचाल चालू झाली असून आतापर्यंत गुन्हा रजिस्टर न करता तपासाच्या नाटकाचा पहिला अंक पूर्ण झाला आहे. सदर प्रकरण दडपून टाकण्याची गृह खात्याचे गुप्त आदेश असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला असून तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. याप्रकरणी तृतीय व चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केल्यास आपण आमरण उपोषण आंदोलन करू, असा इशारा देखील अनिल गोटे यांनी दिला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे नेमकं काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

एसआयटी म्हणजे केवळ काहींना सोयीची ठरणारी समिती : अनिल गोटे

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी एसआयटी नेमण्याचे आदेश दिल्यानंतर माजी आमदार अनिल गोटे यांनी चौकशी समितीवर अविश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. अनिल गोटे म्हणाले होते की, “एसआयटी म्हणजे केवळ काहींना सोयीची ठरणारी समिती आहे.” त्यांनी यापूर्वीच्या जयकुमार रावल यांच्या रावल बँक प्रकरणाचा संदर्भ देत सांगितले होते की, त्या वेळीही एसआयटी स्थापन करण्यात आली होती. तसेच अब्दुल करीम तेलगी घोटाळ्याच्या चौकशीसाठीही एसआयटी नेमण्यात आली होती, परंतु नंतर तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. “खरंच पारदर्शक चौकशी करायची असेल, तर प्रवीण गेडाम, तुकाराम मुंडे आणि धुळ्याचे माजी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचा समावेश असलेली स्वतंत्र आणि विश्वासार्ह समिती स्थापन करावी,” अशी मागणीही गोटे यांनी केली होती. तर मंत्री जयकुमार रावल यांच्या विरोधात माझ्याकडे ठोस कागदोपत्री पुरावे आहेत आणि ते मी राज्यपाल, मुख्यमंत्री, देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्याकडे यापूर्वीच पाठवले आहेत. मात्र, या प्रकरणात आजवर कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्यामुळे “मला या यंत्रणांवर आणि त्यांच्या चौकशीवर विश्वास राहिलेला नाही,” असेही अनिल गोटे यांनी म्हटले होते.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

हेदेखील वाचा

अधिक पाहा..

Comments are closed.