किस्से आणि बरंच काही – प्रामाणिक अदाकारा
>> धनंजय साठे
कॉफी आणि बरंच काही म्हणत ही अभिनेत्री अभिनय क्षेत्रात खरंच बरंच काही करून गेली. आज ती प्रसिद्धी आणि यशाच्या शिखरावर विराजमान झालेली आहे. ती आहे आपल्या अनोख्या हसण्याच्या शैलीने, अभिनय कौशल्याने सिनेमाप्रेमींवर आपल्या अदाकारीची आणि अभिनयाची भुरळ घालणारी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे…!
बडोद्यामध्ये जन्म आणि शिक्षण झालं, पण आपली मातृभाषा मराठीत आणि तेही महाराष्ट्रात काहीतरी करण्याची इच्छा कायम प्रार्थनामध्ये होती. ती नेहमी वडिलांना लहानपणी विचारायची की, आपण मराठी असून गुजरातमध्ये का राहतो? तेव्हा त्यांनी लहानग्या प्रार्थनाला समजावलं की, त्यांचे वडील सयाजीराव गायकवाडांकडे होते आणि तिच्या आईचा जन्मदेखील गुजरातमधला असल्याने आपण इथे राहतो. आज प्रार्थना सांगते की, तिच्या बडोद्याच्या गुजराती मैत्रिणी तिला नेहमी ‘महाराष्ट्रीय’ म्हणायच्या आणि मुंबईत तिची मावस भावंडं तिला ‘गुजराती’ असं चिडवायचे. त्यामुळे प्रार्थनाच्या मनात लहानपणी हे द्वंद्व सतत असायचं.
शाळा संपवून कॉलेजमध्ये जाण्याची वेळ आली तेव्हा तिची आर्टस्मध्ये जाण्याची इच्छा असूनही आईबाबांच्या इच्छेखातर तिने विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. बारावीनंतर तिला जर्नालिझम करायचं होतं, पण तिचे बारावीचे मार्क्स पाहता वडिलांनी तिला गणित, फिजिक्स वा स्टाटिस्टिक्स घेऊन बी.एस्सी करायला सांगितलं. ग्राज्युएट झाल्यावर तिने वडिलांना तिच्या आवडीच्या क्षेत्रात जाऊ द्या अशी विनंती केली. प्रार्थना भरतनाटय़म विशारद होती. पुढे अलंकार करण्यासाठी तिला मुंबईतल्या नालंदा विद्यालयातून पदवी घ्यायची होती आणि जर्नालिझमही करायचं होतं.
नालंदा विद्यालयात तिला आडमिशन मिळाले, पण अभ्यासक्रम पूर्ण करायला वेळ लागला असता म्हणून प्रार्थनाने जर्नालिझममध्ये आडशिमन घेतलं आणि शेवटच्या वर्षाला तिला iBN7 या न्यूज चानलमध्ये इंटर्नशिप मिळाली. नंतर स्टार न्यूजमध्ये पेज थ्री पार्टी कव्हर करू लागली तेव्हा तिला जाणवलं की, इथल्या पेज थ्री विश्वात आपला कितपत टिकाव लागेल? त्यापेक्षा आपण दिग्दर्शन क्षेत्रात जावं. रेणुका शहाणे यांच्या ‘रिटा’ या चित्रपटात ती रेणुका यांची असिस्टंट डायरेक्टर बनली आणि चित्रपट क्षेत्रात आपला पाय रोवला.
‘रिटा’ करत असताना प्रार्थनाला तिच्या डिरेक्शन टीममधल्या एका मैत्रिणीने फोटोशूट करायला लावलं आणि सहज म्हणून बालाजी टेलिफिल्म्सच्या मार्केटिंगमध्ये काम करणाऱया एका ओळखीच्या मित्राकडे ते फोटो पाठवले. त्याने त्यांच्या कास्टिंग टीमला ते फोटो दाखवले आणि तिला
ऑडिशनसाठी कॉल आला. त्या वेळी बालाजीची ‘पवित्र रिश्ता’साठी ऑडिशन्स चालू होत्या. आयुष्यात पहिल्यांदाच
ऑडिशन देत असल्यामुळे त्याबद्दल तिला काहीच कल्पना नव्हती. विना मेकअप साध्या कपडय़ांमध्ये ती ऑडिशनला गेली. तिथे गेल्यावर ज्या व्यक्तिरेखेच्या आाडिशनसाठी तिला बोलावलं होतं, त्यासाठी तिथे सातशेहून अधिक कलाकारांना नकारघंटा ऐकावी लागली होती, पण नशिबाची वेगळीच खेळी होती. ती भूमिका प्रार्थनाच्या पदरात पडली आणि खऱया अर्थाने प्रार्थना बेहेरेचा अभिनय क्षेत्राकडे प्रवास सुरू झाला.
‘पवित्र रिश्ता’ मालिकेचे बरेच एपिसोड्स झाले आणि एक दिवस प्रार्थनाने ‘पवित्र रिश्ता’ ही लोकप्रिय मालिका सोडली. तिच्या आईलाही कळेना की, मुलीने अचानक असं का केलं? प्रार्थनाने आईला समजावलं की, तिला मोठी क्षितिजं खुणावत असल्याने तिने हा धाडसी निर्णय घेतला आहे. दोन महिने चित्रपटात काम मिळण्यासाठी प्रयत्न चालू होते. त्या वेळी एका ऑडिशनसाठी तिला काल आला. ती भूमिका काही तिला मिळाली नाही, पण त्या दिग्दर्शकाने तिला अवधूत गुप्ते यांच्या ‘जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा’च्या छायाचित्रकाराला भेटायला सांगितलं आणि आठवडाभरात तिला कॉल आला. ती भूमिका तिला मिळाली. ते पात्र पंजाबी होतं आणि मराठी फार स्पष्ट न बोलणारं होतं. हेच प्रार्थनाच्या पथ्यावर पडलं. कारण प्रार्थनाला त्या काळात मराठी फारसं चांगलं बोलता येत नव्हतं. कुठल्या गोष्टीचा कसा कोणाला फायदा होईल, हे सांगता येत नाही. तिच्या सोबत काम करणाऱया अभिजित खांडकेकरसोबत तिने मराठी भाषेचे धडे गिरवले आणि त्याचं श्रेय ती अभिजितला देते.
नंतर तिला ‘मितवा’ चित्रपट मिळाला.
‘कॉफी आणि बरंच काही’चे दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांना या चित्रपटासाठी नवी जोडी हवी होती. नवोदित वैभव तत्त्ववादी आणि प्रार्थनाच्या झोळीत हा चित्रपट पडला. म्हणून प्रार्थनाला नशिबाची साथ खूप मोलाची वाटते. ‘मस्का’ चित्रपटाचा दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव हा ‘ढाबा भटिंडा’मध्ये प्रार्थनाचा सहकलाकार होता. त्यामुळे मी, प्रार्थना आणि प्रियदर्शन… आम्ही तिघांनी एकत्र काम केलेला एकमेव चित्रपट म्हणजे ‘मस्का’! चित्रपटाचा मी कार्यकारी निर्माता होतो.
‘मितवा’, ‘व्हाट्सआप लग्न’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘फुगे’, ‘मिस्टर आणि मिसेस सदाचारी’ या सगळय़ा चित्रपटांपैकी तिची सर्वांत आवडती भूमिका ‘मस्का’मधली आहे.
मराठी प्रेक्षक अतिशय चाणाक्ष आहे, चोखंदळ आहे, पण थिएटरमध्ये हवा तसा प्रतिसाद मराठी चित्रपटाला न मिळण्याचं कारण म्हणजे पब्लिसिटीत मराठी सिनेमा कमी पडतो. मी यापूर्वीही म्हटलंय की, मराठी चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात कुठेतरी निर्माता कमी पडतो. त्यामुळे एकवेळ चित्रपट बनवणं सोपं आहे, पण तो जर लोकांपर्यंत पोहोचलाच नाही, तर त्याला काहीच अर्थ नाही.
तर अशा या गुणसंपन्न अभिनेत्री व त्याहीपेक्षा अतिशय प्रामाणिक आणि सच्ची मैत्री निभावणाऱया प्रार्थनाला तिच्या पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा!
(लेखक एफक्रिएटिव्ह हेड, अभिनेते आणि गायक आहेत.)
Comments are closed.