करार – मग एक क्षण
>> प्रा? विश्वास वसेकर
‘क्षण’ या दोन अक्षरी शब्दात आयुष्य सामावले आहे. काही क्षण नकारात्मक असतात तर काही सकारात्मक. काही शिकवणारे तर काही अनुभव देणारे. एखाद्या क्षणामध्ये अणुबॉम्बचे सामर्थ्य असते तर एखाद्यात भरपूर उर्जा! तुमच्या आयुष्यातला, अनुभवातला असा क्षण आठवा, त्यावर विचार करा, चिंतन करा आणि कविता लिहा, पण प्रत्येकाच्या कवितेचे शीर्षक एकच असेल, ‘तो एक क्षण…!’ प्राध्यापकांनी असे सांगितले आणि विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कविता लिहिल्या. प्राध्यापकाने प्रेरणा दिली आणि विद्यार्थ्यांकडून उत्तम कामगिरी करवून घेतली?
चाकरमान्या मराठीच्या प्राध्यापकाला कधी, कोणते काम करावे लागेल याचा काही नेमच नसतो. स्नेहसंमेलनाच्या काळात तर नाही नाही त्या स्पर्धांचे त्याला एक तर संयोजक व्हावे लागते, नाहीतर परीक्षक. परीक्षक होणे सोपे असते. ऐन वेळी यायचे, निकष आणि गुणांचा आयता तख्ता तुम्हाला दिला जातो, त्याआधारे मूल्यांकन करायचे! संयोजकाला मात्र खूप पूर्वतयारी असते. त्याला विषय ठरवायचा असतो, निकष आणि गुणविभागणीही.
एकदा मला सांगण्यात आले की, “उद्या होणाऱया काव्य लेखन स्पर्धेचे तुम्ही संयोजक! विद्यार्थ्यांना ऐन वेळी एक विषय द्या आणि त्या विषयावर तिथल्या तिथे एक कविता लिहायला सांगा.’’ आता आली का पंचाईत! कविता ही उत्स्फूर्तपणे सुचायची गोष्ट असते. एखादा विषय ठरवून ‘पाडायची’ गोष्ट नसते हे वर्षानुवर्षे कंठशोष करीत सांगणाऱया माझ्यावर कसला प्रसंग आला म्हणायचा! काहीही असो, पण सांगितलेले काम त्याबरहुकूम झालेच पाहिजे, नोकरी करायचीय ना तुम्हाला? पगार पाहिजे नं?
थोडा वेळ अस्वस्थ झालो, पण लागलीच तयारीला लागलो. आधी माझी स्वतची पूर्ण तयारी करून घेतली. दहा मिनिटांच्या प्रास्ताविकाचे मनातल्या मनात नियोजन करून हॉलवर गेलो. फळ्यावर विषय लिहिला, ‘तो एक क्षण’. त्याखाली विंदांच्या ‘त्रिवेणी’तील या ओळी लिहिल्या –
एका क्षणातील विराट सामर्थ्याने
पूर्वरचित आयुष्य फुंकरीने उडवीत
एक दिवस
धिमी धिमी पावले टाकीत
उंबरा ओलांडून आत आलीस
आणि म्हणालीस,
‘मी आले’
विद्यार्थी कुतूहलाने वाचीत होते. मी करंदीकरांच्या पहिल्या ओळीकडे त्यांचे लक्ष वेधले. म्हणालो, एका क्षणातसुद्धा कसे विराट सामर्थ्य असू शकते पाहा. मी तुम्हाला काही क्षण सांगतो. महंमद गझनीने सतरा वेळा भारतावर स्वारी केली. एकदा पृथ्वीराज चौहानच्या तो हाती लागला तेव्हा महंमद गझनीने आपल्या प्राणासाठी त्याच्याकडे गयावया केली. तेव्हा उदार मनाने त्याने गझनीला जीवदान दिले. नंतरच्या वेळी मात्र उलटे झाले. पृथ्वीराज चौहानने गझनीला पूर्वीच्या प्रसंगाचे स्मरण दिले. गझनीने तरीही त्याला कठोरपणे ठार मारले. पृथ्वीराजाने गझनीला सोडून दिले तो क्षण निर्णायक ठरला आणि पुढे त्याच्याच जिवाचा घातक बनला. इतिहासात तुम्हाला असे अनेक ‘क्षण’ सापडतील. एका क्षणी झालेल्या चुकीचे परिणाम पुढे अनेक शतकांना भोगावे लागले आहेत.
तारीख डोळ्यांनी ही फेरी देखील पाहिली आहे
क्षण खाल्ले होते,
शतकानुशतके शिक्षा
देवदास या शरदचंद्रांच्या कादंबरीत-चित्रपटात पारू ही त्याची बालमैत्रीण, प्रेयसी रात्री पळून त्याच्याकडे येते तो क्षण. त्या क्षणी निर्णय घ्यायला देवदास डगमगला आणि पार्वतीला त्याने परत पाठवले. या एका क्षणाच्या चुकीने देवदासचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. चित्रपटभर देवदासच्या तोंडी एक वाक्य येते, “उफ् इतनी सी गलती की इतनी बडी सजा!’’
सगळे क्षण नकारात्मकच असतात असे नाही. काही क्षण क्रांतिकारीही असतात. म. गांधींनी एक कृती केली आणि देशाला स्वातंत्र्य मिळाले. तो नेमका क्षण ग. दि. माडगूळकरांनी टिपला आहे –
उचललेस तू मीठ मूठभर
साम्राज्याचा खचला पाया
अशा एका क्षणावर कविता लिहिणे फार अवघड असते. आव्हानात्मक असते. विद्यार्थी मित्रांनो, हे आव्हान तुम्हाला आज पेलायचे आहे. बी. रघुनाथ या महान कवीने हे आव्हान कसे पेलले आहे पाहा…
पहा मी गली बनलो
पहा मी गली बनलो? ? सर्व प्राणी बनले
उलगडले सहजींच मनोदल
रुमरुमली स्वप्नांतील चलबिल
नीरव एकांतास लहडली
सळसळ सुमगंधामधली
पहा मी गली बनलो? ? सर्व प्राणी बनले
खऱया कवीला असा क्षण खऱया अर्थाने जगता, भोगता आणि नेमक्या शब्दांत पकडता येत असतो. बशीर बद्र म्हणतात,
मी एका क्षणात शतके पाहतो
आपल्याबरोबर बराच वेळ आहे
तुम्ही गुलजारची गाणी ऐकली असतील. क्षण म्हणजे ‘लम्हा’ हा त्यांच्या कवितेचा केंद्रबिंदू असतो. त्यांच्या कवितेवरील लेखाला मी नाव दिलं होतं, ‘गुलजार ः क्षणाच्या अंतस्फोटाची कविता’. एखाद्या क्षणामध्ये अणुबॉम्बचे सामर्थ्य असते. तुमच्या आयुष्यातला, अनुभवातला असा क्षण आठवा, त्यावर विचार करा, चिंतन करा आणि कविता लिहा. प्रत्येकाच्या कवितेचे एकच शीर्षक असेल, ‘तो एक क्षण’.
माझ्या दहा मिनिटांच्या या निवेदनाने विचारात गढलेले विद्यार्थी, तीन परीक्षक प्राध्यापक आणि स्पर्धेसाठी माझ्या मदतीला आलेले प्राध्यापक एवढे उत्तेजित व प्रेरित झाले की, सर्वांनी एकापेक्षा एक सरस, उत्कृष्ट कविता लिहिली. त्या कविता म्हणूनही एवढय़ा छान होत्या की, महाविद्यालयाच्या वार्षिक अंकात तर आम्ही छापल्याच, पण अनेक वाङ्मयीन नियतकालिकांनी त्या स्वीकारल्या!
(लेखक ज्यंष्ठ साहित्यिक आहेत)
Comments are closed.