Chhagan Bhujbal will be third dcm say bjp girish mahajan
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असलेल्या छगन भुजबळ यांनी नुकतीच मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर त्यांना माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे अन्न व नागरी पुरवठा विभागाची जबाबदारी देण्यात आली. आधी जाहीर नाराजी दर्शवल्यानंतरही अजित पवारांनी छगन भुजबळ यांना संधी दिल्यानंतर अनेक चर्चा रंगल्या होत्या. यानंतर आता नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रिपदही त्यांच्याकडे जाणार का? याबाबत तर्कवितर्क लावण्यात येत आहे. ते नाशिकच्या पालकमंत्री पदावर दावा करू शकतात, अशी चर्चा सुरू असल्याचे विचारले असता भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी मोठे विधान केले. (Chhagan Bhujbal will be third dcm say bjp girish mahajan)
हेही वाचा : Rahul Gandhi : ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना…; भाजप नेत्याचा राहुल गांधींवर निशाणा
मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, “पालकमंत्री पदावर कोणीही दावा करू शकतो. त्याला काहीच हरकत नाही. पण हा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे. त्यांनी जर मनात आणले तर भुजबळांना पालकमंत्री करतील. फडणवीस भुजबळांना तिसरे उपमुख्यमंत्रीही करू शकतात.” असे विधान केले. त्यानंतर या विधानावर स्पष्टीकरण देताना पुढे ते म्हणाले की, “छगन भुजबळ यांनी असा कोणताही दावा केला नाही, उगाच अशा चर्चा करून तेल ओतू नका.” असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा
राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर पालकमंत्रिपदासाठी स्पर्धा आणखी वाढली आहे,. नाशिक जिल्ह्याला छगन भुजबळ यांच्या माध्यमातून चौथे मंत्रिपद मिळाले आहे. त्यातच शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस तिन्ही पक्ष या जिल्ह्यात आपला दावा पालकमंत्रिपदावर करत आहेत. भाजपचे गिरीश महाजन, शिवसेनेचे दादा भुसे आणि राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांच्यापैकी कोणाकडे नाशिकचे पालकत्व जाणार? याबाबत अनेक चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, शिक्षणमंत्री दादा भुसे, अन्न व औषध मंत्री नरहरी झिरवाळ त्यानंतर आता मंत्री छगन भुजबळ असे चार कॅबिनेट मंत्री आले आहेत. मुळे नाशिकमध्ये पालकमंत्री कोण होणार? हा उत्सुकतेचा विषय ठरला आहे.
Comments are closed.