ईपीएफओच्या व्याजदराला केंद्राची मंजुरी, पीएफ खात्यात 1 लाख रुपये जमा असल्यास व्याज किती मिळणार?

नवी दिल्ली : आर्थिक वर्ष 2024-25 साठी ईपीएफओकडून शिफारस करण्यात आलेल्या 8.25 टक्के व्याज दराला केंद्र सरकारनं मंजुरी दिली आहे. 2023-24 मध्ये देखील 8.25 टक्के व्याज पीएफ खातेदारांना देण्यात आलं होतं. तोच व्याज 2024-25 साठी कायम ठेवण्यात आला आहे. केंद्र सरकारनं या व्याजदराला मंजुरी दिल्यानंतर व्याजाची रक्कम ईपीएफओकडून पीएफ खात्यात जमा केली जाईल.

EPFO ने 28 फेब्रुवारी 2024 ला आर्थिक वर्ष 2024-25 साठी वार्षिक व्याज दर  8.25 टक्के ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर हा प्रस्ताव वित्त मंत्रालयाकडे पाठवण्यात आला होता. वित्त मंत्रालयानं ईपीएफओच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. आता लवकरच व्याजाची रक्कम देशातील 7 कोटी पीएफ खातेदारांच्या पीएफ खात्यात जमा करण्यात येणार आहे.

पीएफ खात्यात 1 लाख रुपये असल्यास किती पैसे मिळणार?

8.25 टक्क्यांच्या हिशोबानं जर एखाद्या पीएफ खातेधारकाच्या खात्यात 1 लाख रुपये जमा असली तर त्याच्या खात्यात 8250 रुपये जमा होतील. जर,1 एप्रिल 2024 रोजी पीएफ खात्यात 5 लाख रुपये जमा असतील तर त्या हिशोबानं 5 लाखांवर 41250 रुपये व्याज म्हणून मिळतील. जर, खात्यात 3 लाख रुपये असतील तर 24750 रुपये मिळतील.

ईपीएफओच्या कायद्यानुसार कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतन आणि महागाई भत्त्याच्या 12 टक्के रक्कम पीएफ खात्यात जमा केली जाते. त्याशिवाय  कंपनी देखील पीएफ साठी 12 टक्के रक्कम जमा करते. कंपनीच्या 12 टक्क्यांपैकी 3.67 टक्के रक्कम पीएफ खात्यात तर 8.33 टक्के रक्कम पेन्शन योजनेत जमा होते. कर्मचाऱ्याचं योगदान पीएफ खात्यात जमा होतं.

1952 मध्ये किती व्याज मिळालेलं?

1952 पीएफ खात्यातील शिल्लक रकमेवर 3 टक्के व्याज देण्यात आलं होतं. त्यानंतर त्यामध्ये वाढ होत गेली. 1972 मध्ये 6 टक्के व्याज दिलं होतं. 1984 मध्ये ईपीएफओच्या व्याजाची टक्केवारी 10 टक्क्यांवर पोहोचली होती. त्यानंतर 1989 ते 1999 या काळात पीएफ खात्यावर चांगलं व्याज मिळालं होतं. या दरम्यान पीएफ खात्यात 12 टक्क्यांपर्यंत व्याज मिळालं होतं. त्यानंतर घसरण सुरु झाली. 1999 नंतर 10 टक्के व्याज मिळालेलं नाही. 2001 नंतर पीएफ खात्यावरील व्याजदर 9.50 टक्क्यांपेक्षा कमी राहिलं आहे.

आर्थिक वर्षाच्या शेवटी व्याज दर निश्चित केले जातात. फायनान्स इन्वेस्टमेंट अँड ऑडिट कमिटीची बैठक होते. त्यामध्ये आर्थिक वर्षात जमा झालेल्या रकमेची माहिती दिली जाते. यानंतर सीबीटीची बैठक होते. त्यानंतर वित्तमंत्रालयाकडून मंजुरी घेतली जाते. त्यानंतर व्याजदराची रक्कम जमा केली जाते.

दरम्यान, ईपीएफओशी जोडल्या जाणाऱ्या सदस्यांची संख्या सातत्यानं वाढत आहे. मार्च 2025 मध्ये 14.6 लाख नवे सदस्य ईपीएफओशी जोडले गेलेले आहेत. ज्यामध्ये अधिक लोक पहिल्यांदा पीएफ योजनेत आले आहेत.

हेदेखील वाचा

अधिक पाहा..

Comments are closed.