Gajanan Kirtikar shocking statement saying that Shinde Group is BJP-inspired
शिवसेना पक्षामध्ये फूट पडल्यानंतर पक्षातील अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत उघड नाराजी व्यक्त केली आणि त्यांनी एकनाथ शिंदेंच्या सेनेत प्रवेश केला. पण आता एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेमधील वाद ही चव्हाट्यावर येऊ लागला आहे.
मुंबई : शिवसेना पक्षामध्ये फूट पडल्यानंतर पक्षातील अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत उघड नाराजी व्यक्त केली आणि त्यांनी एकनाथ शिंदेंच्या सेनेत प्रवेश केला. पण आता एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेमधील वाद ही चव्हाट्यावर येऊ लागला आहे. कारण या पक्षातील काही नेत्यांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. अशातच आता पक्षातील एका बड्या नेत्याने एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना ही भाजपाप्रणित असल्याचे विधान केले आहे. हे नेते दुसरे तिसरे कोणी नसून माजी खासदार गजानन कीर्तिकर आहेत. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कीर्तिकरांनी हे धक्कादायक विधान केले आहे. कीर्तिकरांनी पक्षावर उघडपणे नाराजी व्यक्त करत पक्षाला घरचा आहेर दिला आहे. (Maharashtra Politics: Gajanan Kirtikar shocking statement saying that Shinde Group is BJP-inspired)
शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांनी शनिवारी (ता. 7 जून) एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी म्हटले की, शिवसेनेच्या मतात विभाजन होते आणि शिवसेनेचे नुकसान होते. हे कोणीही सांगेल. सध्या जे आहे हे त्रिभाजन आहे. दोन बंधू एकत्र आल्यावर त्यांचा तरी जनाधार त्यांना मिळेल. एकनाथ शिंदे यांना भाजपासोबत लढायचे आहे, कारण शिंदेंची शिवसेना भाजपाप्रणित आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना काँग्रेसप्रणित आहे. आम्हाला भाजपाप्रणित किंवा काँग्रेसप्रणित शिवसेनाच्याऐवजी आम्हाला बाळासाहेबांची शिवसेना प्रमाण आहे. हे करण्याचा प्रयत्न करावा. मतदारही त्याच पद्धतीने विचार करतील. दोन बंधू एकत्र आल्यावर शिवसेनेचे गढूळ झालेले वातावरण शुद्ध होईल, असे आम्हाला वाटत असल्याचे मत कीर्तिकर यांनी व्यक्त केले.
हेही वाचा… Devendra Fadnavis : हा महाराष्ट्राच्या मतदारांचा अपमान, राहुल गांधींच्या आरोपांवर फडणवीसांचा पलटवार
तर, आता मला अडीच वर्ष झाली एकनाथ शिंदे यांच्याकडे येऊन. मी एवढे भक्कम संघटनात्मक काम केले. लोकाधिकार समितीच्या चळवळीत राहून काम केले. 20 वर्ष आमदार, 10 वर्ष खासदार, मंत्री पाच वर्ष एवढा अनुभव असूनही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने माझा कोणताही उपयोग करून घेतला नाही. याची खंत माझ्या मनात आहे, असे यावेळी गजानन कीर्तिकर यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. परंतु, शिंदेंची सेना ही भाजपाप्रणित असल्याचे विधान कीर्तिकरांनी केल्याने खळबळ उडाली आहे. कारण, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नेहमीच शिंदेंची सेना ही अमित शहा चालवत असल्याचा दावा करतात. पण आता मात्र, शिंदेंच्या पक्षातील एका बड्या नेत्याने हे विधान केल्याने शिंदेंनी आपला पक्ष खरंच भाजपाच्या हाती तर दिला नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Comments are closed.