गुकेशने जेतेपदाची संधी गमावली, मॅग्नस कार्लसनने जिंकली नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा

अखेरच्या फेरीपर्यंत रंगलेल्या नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेत अखेर जगज्जेत्या हिंदुस्थानच्या डी. गुकेशने जेतेपदाची संधी गमावली. तो स्पर्धेत तिसऱ्या स्थानी राहिला. यजमान नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने विजेतेपदाला गवसणी घालण्यात यश मिळविले.
डी. गुकेशला अखेरच्या दहाव्या फेरीत अमेरिकन ग्रॅण्डमास्टर फॅबियानो कारूआना याच्याकडून हार पत्करावी लागली. याचाच फायदा कार्लसनला झाला. गुकेशने अखेरची फेरी जिंकली असती, तर जेतेपदाची माळ त्याच्याच गळ्यात पडली असती. कार्लसनला हिंदुस्थानच्या अर्जुन एरिगॅसीने बरोबरीत रोखण्याचा पराक्रम केला, पण गुकेशला विजयाने हुलकावणी दिली अन् त्याचे जेतेपद राखण्याचे स्वप्न भंगले. कार्लसनने सर्वाधिक 16 गुणांसह सातव्यांदा या स्पर्धेच्या विजेतेपदाला गवसणी घातली.
होतीसरे गुकेशने 10व्या फेरीत सुरेख सुरुवात केली मग गडबडलेल्या गुकेशने कमी वेळ उरल्याने मोठी चूक केली अन् या चुकीतून त्याची सुटका होऊ शकली नाही. लढत संपायला केवळ 2 सेकंद वेळ शिल्लक असताना गुकेशने पराभव मान्य केला. त्याचा पराभवाचा थेट फायदा पाच वेळच्या जगज्जेत्या कार्लसनला झाला. फॅबियानो कारूआनाला 15.5 गुणांसह उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले, तर गुकेश 14.5 गुणांसह तिसऱ्या स्थानी राहिला. हिंदुस्थानचा अर्जुन एरिगॅसी 12.5 गुणांसह पाचव्या स्थानी राहिला.
महिला गटात मुजीचुक विजेती
या स्पर्धेच्या महिला गटात दोन वेळची वर्ल्ड ब्लिट्स चॅम्पियन युक्रेनच्या अन्ना मुजीचुक हिने विजेतेपद पटकाविले. तिने अखेरच्या फेरीत हिंदुस्थानच्या आर. वैशाली हिचा आर्मागेडन टायब्रेकमध्ये पराभव करीत 16.5 गुणांसह जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. हिंदुस्थानची कोनेरी हम्पी 15 गुणांसह तिसऱ्या स्थानी राहिली, तर स्पर्धेत निराशाजनक कामगिरी केलेल्या वैशालीने 11 गुणांसह आपले अभियान समाप्त केले.
Comments are closed.