हिंदुस्थानची 6 सुवर्णांसह 9 पदकांची लयलूट!

हिंदुस्थानी खेळाडूंनी तैवान अॅथलेटिक्स स्पर्धेत रविवारी 6 सुवर्णांसह 2 रौप्य व 1 कांस्य अशी एकूण 9 पदकांची लयलूट करीत अखेरचा दिवस गाजविला. तीन वेळची राष्ट्रीय चॅम्पियन विथ्या रामराज, रोहित यादव, पूजा, अन्नू राणी व कृष्ण कुमार व पुरुषांच्या 4 बाय 400 मीटर शर्यतीत हिंदुस्थानी खेळाडूंनी सुवर्णपदकांचा षटकार ठोकला. तामीळनाडूच्या विथ्या रामराज हिने महिलांच्या 400 मीटर अडथळा शर्यतीत 56.53 सेकंद वेळेसह सोनेरी यश संपादन केले. यंदाच्या हंगामातील तिची ही तिसरी सर्वोत्तम कामगिरी होय. या सोनेरी यशासह विथ्याने आगामी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी महत्त्वपूर्ण गुणांची कमाई केली. पुरुषांच्या 400 मीटर अडथळा शर्यतीत यशास पलाक्ष याने हिंदुस्थानला रौप्यपदक जिंकून दिले. दोन वेळचा राष्ट्रीय चॅम्पियन असलेल्या रोहित यादवने भालाफेकीत 74.42 मीटर फेकी करीत सुवर्णपदकावर नाव कोरले.

Comments are closed.