उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत घर द्या, म्हाडा उपाध्यक्षांचे आदेश; ‘मास्टर लिस्ट’मधील विजेत्याला दिलासा

दोन वर्षांपूर्वी मास्टर लिस्टवरील संगणकीय सोडतीत पात्र ठरलेल्या अर्जदाराला ताबडतोब घर देण्याचे आदेश म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी सोमवारी म्हाडा मुख्यालयात आयोजित लोकशाही दिनात दिले. त्यामुळे या अर्जदाराला दिलासा मिळाला आहे.

मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील मास्टर लिस्टवरील जुन्या उपकरप्राप्त इमारतीतील नरेंद्र निगुडकर हे रहिवासी असून ते संक्रमण गाळय़ात वास्तव्यास होते. 2024 मध्ये त्यांना मास्टर लिस्टवरील संगणकीय सोडतीत घराची लॉटरी लागली. त्यानुसार त्यांनी संक्रमण शिबिरातील गाळा मंडळाकडे सुपूर्द केला. मात्र अँटॉप हिल येथील घराचा ताबा त्यांना विकासकाकडून अद्याप मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी लोकशाही दिनात अर्ज केला होता. याची गंभीर दखल घेत ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष जयस्वाल यांनी सदरप्रकरणी चर्चा करण्यासाठी विकासकास तत्काळ म्हाडा कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत संबंधित अधिकाऱयांना निर्देश दिले. तसेच निगुडकर यांना वितरित करण्यात आलेल्या घराचा ताबा उद्या, मंगळवारी दुपारी 12 वाजेपर्यंत देण्याचे निर्देश अधिकाऱयांना दिले. ‘म्हाडा’च्या 12 व्या लोकशाही दिनात नागरिकांच्या आठ अर्जांवर सुनावणी घेण्यात आली.

Comments are closed.