विजय रुपानीचा मृतदेह ओळखला

आज राजकोटमध्ये अंत्यसंस्कार : डीएनए नमुने जुळवण्याची प्रक्रिया गतिमान : आतापर्यंत 20 मृतदेह कुटुंबीयांकडे सुपूर्द

वृत्तसंस्था/ अहमदाबाद

गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान अपघातानंतर चौथ्या दिवशीही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये डीएनए नमुने जुळवण्याची प्रक्रिया सुरू आहे. चौथ्या दिवशी गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचे डीएनए जुळले. गुजरातचे गृह राज्यमंत्री हर्ष संघवी आणि आरोग्यमंत्री ऋषिकेश पटेल यांनी याची पुष्टी केली आहे. अधिकृत अपडेटनुसार आता 20 मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवण्यात आले आहेत. रुपानी यांचा मृतदेह कुटुंबीयांकडे सोपविल्यानंतर आता सोमवारी त्यांच्या पार्थिवावर राजकोटमध्ये अंत्यसंस्कार केले जातील अशी माहिती देण्यात आली. एकीकडे मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम सुरू असतानाच दुसरीकडे, देशातील सर्वात मोठ्या विमान अपघाताच्या घटनेमागील कारण शोधण्यात तपास पथके गुंतलेली आहेत.

विमान दुर्घटनेत बहुतेक मृतदेह पूर्णपणे जळाल्यामुळे त्यांची ओळख पटवणे अशक्य असल्याने या भयानक दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख पटविण्यासाठी अधिकारी डीएनए चाचण्या घेत आहेत. आतापर्यंत ओळख पटवण्यात आलेले सर्व मृतदेह गुजरात आणि राजस्थानमधील वेगवेगळ्या ठिकाणांशी संबंधित आहेत. उदयपूर, वडोदरा, खेडा, मेहसाणा, अहमदाबाद आणि बोटाड जिह्यातील प्रवाशांचे मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आले असल्याचे सरकारी बीजे मेडिकल कॉलेजमधील शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. पटेल यांनी सांगितले. पीडित कुटुंबांशी समन्वय साधण्यासाठी 230 पथके तयार करण्यात आली आहेत. लंडनला जाणाऱ्या विमानात प्रवासी आणि क्रू मेंबर्ससह 242 जण होते, त्यापैकी 241 जणांचा मृत्यू झाला. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री रुपानी यांचाही समावेश आहे.

आतापर्यंत 248 नमुन्यांची तपासणी

विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 241 प्रवाशांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यासाठी आतापर्यंत एकूण 248 नमुने घेण्यात आले आहेत. या विमान अपघातातील मृतांची संख्या वाढू शकते. राज्य सरकारने अद्याप अधिकृतपणे कोणतीही पुष्टी केलेली नाही, परंतु वसतिगृहात उपस्थित असलेल्या मेस कर्मचारी आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांसह मृतांची संख्या 280 च्या आसपास पोहोचली आहे. या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या परदेशी नागरिकांच्या नातेवाईकांचेही नमुने घेतले जातील. त्यानंतर त्यांचे मृतदेह त्यांच्याकडे सोपवले जातील. शुक्रवारी रात्रीपासून परदेशी प्रवाशांच्या नातेवाईकांच्या आगमनाची प्रक्रिया सुरू झाली आहे.

एकूण 32 जण जखमी, एक गंभीर

बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृह मेसवर एअर इंडियाचे विमान एआय 171 कोसळल्यानंतर झालेल्या अपघातात इंटर्न, वैद्यकीय विद्यार्थी आणि इतर लोकांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अधिकृत माहितीनुसार, या विमान अपघातात 32 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी 8 जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत. एकाची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातानंतर, बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहातील पाचही इमारती रिकामी करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले आहे.

Comments are closed.