घाऊक महागाई दरात मोठी घसरण
14 महिन्यातील सर्वात कमी पातळी, सामान्यांना दिलासा, जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
नुकत्याच संपलेल्या मे महिन्यात घाऊक महागाई निर्देशांकात घट दिसून आली आहे. हा निर्देशांक गेल्या 14 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहचला आहे. जीवनावश्यक वस्तूचे घाऊक दर कमी झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मे महिन्यातील घाऊक महागाई दर प्रतिमहिना आधारावर पाहिले असता 0.85 टक्के दरावरुन 0.39 टक्के दरापर्यंत खाली आला आहे.
मुख्यत: अन्नपदार्थ, वीज, इतर उत्पादित वस्तू, रासायनिक पदार्थ आणि रासायनिक उत्पादने, इतर वाहतूक साधने आणि बिगर अन्न उत्पादने यांच्या दरवाढीचे प्रमाण घटल्याने निर्देशांकात काही प्रमाणात घसरण झाल्याचे दिसून येत आहे. एप्रिल 2025 च्या तुलनेत मे 2025 मध्ये घाऊक महागाई निर्देशांक उणे 0.006 होता, अशी माहिती केंद्रीय सांख्यिकी विभागाने सोमवारी प्रसिद्ध केली.
मुख्य वस्तू निर्देशांकात घट
व्यापार विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार मुख्य वस्तू दर निदेशांकातही मे महिन्यात एप्रिल महिन्याच्या तुलनेत घट झाली आहे. एप्रिलमध्ये हा दर 184.4 होता. तर तो मे महिन्यात 184.3 इतका होता. ही घट वरकरणी किरकोळ दिसत असली, तरी परिणामांच्या दृष्टीने मोठी आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
काही अन्नपदार्थ महागले
काही अन्नपदार्थांच्या दरात मात्र मे मध्ये एप्रिलच्या तुलनेत वाढ दिसून आली आहे. मात्र, वीजेचे दर एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे मध्ये काही प्रमाणात कमी झाले आहेत. काही उत्पादित वस्तूंचे दर मात्र एप्रिल इतकेच राहिले आहेत. एकंदर महागाईच्या आघाडीवर काहीसा दिलासा या नव्या माहितीमुळे मिळाला आहे.
अंडी, मासे, मांसाच्या दरात घट
पालेभाज्या, फळभाज्या अंडी, मासे आणि मांसाच्या दरात मे महिन्यात काही प्रमाणात घट दिसून आली आहे. एप्रिलच्या तुलनेत ही घट 0.5 टक्के इतकी असल्याचे वाणिज्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या माहितीवरुन दिसत आहे. भाज्यांच्या दरात एप्रिलच्या तुलनेत उणे 1.56 टक्के वाढ झाली आहे. याचाच अर्थ भाज्यांचे दर काही प्रमाणात एप्रिलच्या तुलनेत कमी झाले आहेत. त्याच प्रमाणे डाळींचा महागाई दर मे महिन्यात एप्रिलच्या तुलनेत उणे 10.41 टक्के इतका राहिला. त्यामुळे डाळींच्या घाऊक दरातही घट दिसून आली आहे. गव्हाच्या दरात मात्र काहीही वाढ दिसून येत असली तरी ती मोठ्या परिणाम घडविण्याइतकी मोठी नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. अंडी. मांस आणि मासे यांच्या दरातही मे महिन्यात एप्रिल महिन्याच्या तुलनेत किंचित घट झाल्याचे दिसून येत आहे.
काही बिगर अन्न वस्तूंच्या दरात वाढ
मे महिन्यात बिगर अन्नवस्तूंच्या दरात किंचित वाढ एप्रिल महिन्याच्या तुलनेत दिसून आली आहे. एप्रिल महिन्यात हा दर 1.40 टक्के होता. मात्र, मे महिन्यात तो 1.56 टक्के होता. याचा अर्थ त्यात 0.16 टक्के वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तथापि, ही वाढ फार मोठी नसल्याने एकंदर निर्देशांकावर फारसा विपरीत परिणाम करणारी नाही, असे स्पष्टीकरण वाणीज्य विभागाने केले आहे.
कच्च्या इंधन तेलदरात घट
मे महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या इंधन तेलाच्या दरात घट झाली आहे. त्याचप्रमाणे नैसर्गिक वायूचे दरही घटले आहेत. ही घट एप्रिल महिन्याच्या तुलनेत 12.43 टक्के आहे. यामुळे भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर एप्रिलच्या तुलनेत स्थिर राहिले आहेत. ही बाब अर्थव्यवस्थेच्या एकंदर समतोलाच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक आहे. मात्र, इस्रायल आणि इराण यांच्या संघर्षामुळे जून मध्ये कच्च्या इंधन तेलाच्या दराची स्थिती काय राहील, याकडे लक्ष दिले जात आहे.
Comments are closed.