पाकिस्तानला आणखी एक मोठा पराभव सहन करावा लागला

‘फिल्ड मार्शल’ असीम मुनीर यांना आमंत्रण दिले नसल्याचे अमेरिकेकडून स्पष्टीकरण

वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी

अमेरिकेच्या सेनेचा 250 वा स्थापना दिन अमेरिकेत शनिवारी, अर्थात 14 जूनला साजरा करण्यात आला आहे. या ऐतिहासिक समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून पाकिस्तानचे सेना प्रमुख आणि नुकतीची ‘फिल्ड मार्शल’ पदावर नियुक्ती करण्यात आलेले असीम मुनीर यांना आमंत्रित करण्यात आले आहे, असे वृत्त सर्वत्र पसरविण्यात आले होते. यामुळे पाकिस्तानमध्ये आनंदाची लाट उसळली होती. तथापि, त्यांना असे कोणतेही निमंत्रण देण्यात आलेले नाही, हे अमेरिकेने या कार्यक्रमाच्या आधी काही तास स्पष्ट केल्याने पाकिस्तानची पुन्हा फजिती झाली आहे. ही अफवा कोणी पसरविली याचा शोध आता घेतला जात आहे.

असीम मुनीर यांनी साधारणत: दोन महिन्यांपूर्वी हिंदू-मुस्लीम संदर्भात अत्यंत प्रक्षोभक आणि दर्जाहीन विधान केले होते. त्यामुळे काही दिवसांमध्येच जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी क्रूर हल्ला करुन 25 हिंदू पर्यटकांचे बळी त्यांचा धर्म विचारुन घेतले होते. अशा धर्मांध प्रवृत्तीच्या मुनीर यांना अमेरिकेने आपल्या ऐतिहासिक कार्यक्रमाचे अतिथीपद देऊ केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. तथापि, हे वृत्त खोटे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आपल्या विरोधी पक्षांचीही गोची

मुनीर यांना अमेरिकेने असे मानाचे स्थान देणे, हा भारताच्या परराष्ट्र धोरणाचा पराभव आहे, अशी टीका काँग्रेस आणि इतर काही विरोधी पक्षांनी केली होती. भारत अमेरिकेला आपला जवळचा मित्र मानतो. तथापि, या मित्राने मुनीर यांच्यासारख्या व्यक्तीला आपल्या ऐतिहासिक समारंभाचे अथिती म्हणून बोलाविले आहे. त्यामुळे भारत आंतरराष्ट्रीय राजकारणात एकटा पडल्याचे सिद्ध झाले आहे. हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या विदेश धोरणाचा सपशेल पराभव आहे, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते पवन खेडा यांनी केली होती. तथापि, मुनीर यांना कोणतेही आमंत्रण दिले नसल्याचे अमेरिकेने स्पष्ट केल्याने काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांची मोठीच अडचण झालेली आहे.

भाजपच्या हाती कोलित

कोणीतरी उठविलेल्या एका अफवेवर विश्वास ठेवून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या विदेश धोरणावर टीका केल्याने भारतीय जनता पक्षाच्या हाती आयतेच कोलित लागले आहे. काँग्रेस पक्ष किती अधीर आणि उतावळा झाला आहे, याची प्रचीती या प्रसंगावरुन येते, अशी टीका या पक्षाने केली आहे. पाकिस्तानच्या मुनीर यांना अमेरिकेने आमंत्रण दिल्याच्या बनावट वृत्ताने  देखील भारतातील काही विरोधी पक्षांना आनंदाच्या उकळ्या फुटतात. यावरुन त्यांची प्रवृती स्पष्ट होते. सत्तेपासून बराच काळ दूर असल्यामुळे घायकुतीला आलेल्या विरोधी पक्षांना आता काल्पनिक वृत्तेही खरी वाटू लागली आहेत. ही त्यांची स्थिती दयनीय आहे, अशी खोचक टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे

अन्य प्रसंगातही असाच प्रकार

यंदा जी-7 संघटनेची शिखर परिषद कॅनडात होत आहे. या परिषदेचे आमंत्रण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेले नाही. गेल्या सहा वर्षांमध्ये प्रथमच असा प्रकार घडत आहे, अशी टीका काँग्रेसने केली होती. तसेच भारताचे परराष्ट्र धोरण किती चुकीच्या मार्गाने जात आहे आणि भारताची किंमत आंतरराष्ट्रीय स्तरावर किती कमी झाली आहे, हे यावरुन दिसून येते, अशीही टिप्पणी काँग्रेसकडून करण्यात आली होती. तथापि, कॅनडाचे नेते मार्क कर्नी यांनी स्वत: दूरध्वनी करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या परिषदेचे आमंत्रण दिले. तसेच भारताशिवाय ही परिषद होऊ शकत नाही, अशा अर्थाचे विधानही नंतर केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी या परिषदेला उपस्थित राहिले. अशा प्रकारे गेल्या एका आठवड्यात दोनदा अशा प्रकारे विरोधी पक्षांची कोंडी झाल्याचे दिसून येत आहे.

Comments are closed.