इराणचा पराभव निश्चित…विनाशापूर्वीच त्यांनी चर्चेसाठी यावे; G 7 बैठकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा

इस्रायल- इराण युद्धामुळे जगभरात तणावाचे आणि अनिश्चिततेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलला पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच या युद्धात इराणचा पराभव निश्चित आहे. त्यामुळे विनाश होण्यापूर्वीच त्यांनी चर्चेसाठी यावे, असा निर्वाणीचा इशाराही त्यांनी इराणला दिला आहे. कॅनडामध्ये झालेल्या G 7 बैठकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलला पाठिंबा जाहीर केला. इराण इस्रायलविरुद्धच्या युद्धात जिंकू शकणार नाही, त्याचा पराभव निश्चित आहे. त्यामुळे त्यांनी खूप उशीर होण्यापूर्वी चर्चेद्वारे हा प्रश्न सोडवावा, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
इस्रायलने इराणच्या संरक्षण मंत्रालयाच्या मुख्यालयावर हल्ला केला आणि बुशेहर प्रांतातील जगातील सर्वात मोठ्या नैसर्गिक वायू प्रकल्पावर हल्ला केला. या इस्रायली कारवाईत इराणचे अणुशास्त्रज्ञ आणि उच्च लष्करी अधिकाऱ्यांनाही लक्ष्य करण्यात आले. या घडामोडीनंतर ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला आहे. इराणने इस्रायलच्या ‘ऑपरेशन रायझिंग लाइन’ विरुद्ध ‘ऑपरेशन ट्रू प्रॉमिस’ सुरू केले. इराणने शनिवारी रात्रीपासून रविवार सकाळपर्यंत इस्रायलवर हल्ला केला.
G 7 च्या आधी ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला होता की जर इराणने अमेरिकेवर किंवा त्याच्या कोणत्याही मालमत्तेवर हल्ला केला तर आम्ही पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देऊ, यात जगाने याआधी पाहिला नसेल असा विनाश होईल, अशी धमकीही त्यांनी इराणला दिली होती.
Comments are closed.