इराणच्या सरकारी मीडिया कार्यालयावरील हल्ल्यानंतर, अँकर सहर इमामी बुलेटिन देण्यासाठी परतली! इस्त्रायलला सुनावले खडे बोल

इस्त्रायलने इराणच्या सरकारी मीडिया कार्यालयावर (IRIB) हल्ला केला, ज्यामुळे लाइव्ह प्रसारणादरम्यान अँकरला स्टुडिओ सोडून पळ काढावा लागला होता. मीडिया कार्यालयावरील हा हल्ला इतका तीव्र होता की, इराणची राजधानी तेहरानसह अनेक भागांमध्ये स्फोटांचा आवाज घुमला. इराणच्या IRIB (इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण ब्रॉडकास्टिंग) वर इस्रायली हल्ल्याचा एक भयानक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये दिसणारी अँकर सहर इमामी आता इराणमध्ये प्रतिकाराची प्रतीक बनली आहे. इराणमधील लोक हा व्हिडिओ सतत शेअर करत आहेत आणि देशाचा कणखर आवाज म्हणत आहेत.

इराणच्या राष्ट्रीय टीव्ही कार्यालयावर झालेल्या हल्ल्यात या संस्थेचे मोठे नुकसान झाले आणि थेट प्रक्षेपण थांबवण्यात आले. या हल्ल्यात काही लोकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त देखील आहे. परंतु हल्ल्यानंतर लगेचच अँकर सहर इमामी लाईव्ह बुलेटिन करण्यासाठी परत आल्या. इराणी माध्यमांनी घटनेचा व्हिडिओ शेअर केला आणि म्हटले की, हा स्फोट टीव्हीवर लाईव्ह असताना झाला आणि अँकर इस्रायलचा तीव्र निषेध करत होत्या. यानंतर एक स्फोट झाला, स्फोटानंतर स्टुडिओमध्ये काहीतरी पडताना दाखवण्यात आले. काही क्षणातच सहर इमामी लाईव्ह प्रक्षेपण सोडून जाताना दिसल्या होत्या.

इस्रायली संरक्षणमंत्र्यांनीही या हल्ल्याची पुष्टी केली आहे. हल्ल्यानंतरही काही तासांनंतर, IRIB ने त्याचे प्रसारण पुन्हा सुरू केले. आणि पुन्हा एकदा सहर इमामी बुलेटिन करण्यासाठी पडद्यावर आल्या. हल्ल्यानंतर सहर इमामी पुन्हा अॅंकरींग करताना अगदी स्पष्ट आणि ठामपणे म्हणाली, “जे काही घडले ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडपण्याचा इस्रायली राजवटीचा एक हताश प्रयत्न होता.” ” न्यूज नेटवर्कच्या इमारतीवर हल्ला झाला, तर सत्याचा आवाज दडपला जाणार नाही.” तिने इस्रायलला आव्हान दिले आणि म्हटले की आम्ही आमचे काम सुरू ठेवू आणि राष्ट्रीय माध्यमे ताकदीने प्रसारित करत राहतील.

इस्रायलच्या हल्ल्यांमुळे निराश आणि हताश झालेल्या इराणी जनतेवर सहरच्या बोलण्यामुळे एक अनोखा जोश पाहायला मिळाला. इराणसह जगभरातील लोक या अँकरच्या धाडसाचे कौतुक करत आहेत.

Comments are closed.