विजय रुपानी यांनी राज्य सन्मानाने अंत्यसंस्कार केले

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले अंत्यदर्शन

वृत्तसंस्था/ राजकोट

अहमदाबाद येथील एअर इंडिया विमान दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचा मृत्यू झाला होता. विजय रुपानी यांच्या पार्थिवावर राजकोट येथे सोमवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. विजय रुपानी यांच्या अंत्ययात्रेवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत उपस्थित होते. तसेच यावेळी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

विजय रुपानी यांचे पार्थिव सोमवारी त्यांच्या कुटुंबीयांना सोपविण्यात आले होते. यावेळी त्यांच्या पत्नी अंजली रुपानी आणि कुटुंबाचे अन्य सदस्य उपस्थित होते. पार्थिव विशेष विमानाने राजकोट येथे आणले गेले. हा केवळ आमच्यासाठी नव्हे तर स्वकीय गमाविलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी दु:खाचा क्षण आहे. आम्ही अत्यंत अधिक दु:ख व्यक्त करत आहोत, असे उद्गार दिवंगत विजय रुपानी यांचे जावई निमित मिश्रा यांनी काढले आहेत.

तर अमित शाह यांनी राजकोट येथे पोहोचून विजय रुपानी यांना श्रद्धांजली वाहिली. राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनीही अंत्यदर्शन घेतले. विमान दुर्घटनेच्या 4 दिवसांनी आतापर्यंत डीएनए परीक्षणाद्वारे 99 पीडितांची ओळख पटविण्यात आली आहे. यातील 64 मृतदेह संबंधित परिवारांना सोपविण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

भारतीय डॉक्टर करणार पीडितांना मदत

संयुक्त अरब अमिरातमध्ये राहत असलेले भारतीय डॉक्टर शमशीर वायलिल यांनी विमान दुर्घटनेमुळे प्रभावित वैद्यकीय विद्यार्थी आणि डॉक्टरांच्या परिवारांसाठी 6 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. दुर्घटनेनंतरची स्थिती पाहून मी स्तब्ध झालो असे त्यांनी म्हटले आहे. डॉ. शमशीर हे 4 मृत विद्यार्थ्यांच्या परिवारांसाठी प्रत्येकी 1 कोटी रुपये, गंभीर जखमी विद्यार्थ्यांना प्रत्येकी 20 लाख रुपये तर जीव गमाविलेल्या डॉक्टरांच्या परिवारांसाठी प्रत्येकी 20 लाख रुपयांची मदत देणार आहेत.

 

Comments are closed.