रो-ओचा गुलाब शुभ आहे

हिंदुस्थानी कसोटी संघाचा नवा कर्णधार शुभमन गिल हे रो-को अर्थातच रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे मिश्रण असल्याचे गौरवोद्गार काढलेत इंग्लंडचा धडाकेबाज सलामीवीर जोस बटलरने. येत्या शुक्रवारपासून लीड्सवर इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला प्रारंभ होत असून या कसोटीत तो मैदानात बिनधास्त होऊन संघाचे नेतृत्व करेल, असा विश्वासही बटलरने व्यक्त करत शुभमन गिलचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.

इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत जोस बटलरने आपल्या आयपीएल कर्णधाराबद्दल भरभरून भावना व्यक्त केल्या. या मोसमात बटलर गुजरातकडून खेळला होता आणि गिल त्यांचा कर्णधार होता. त्यामुळे बटलरने या कर्णधाराचे अनुभव पॉडकॉस्टवर बोलून दाखवले. 25 वर्षीय गिलला आपल्या नेतृत्वात आणि फलंदाजीत संतुलन साधावे लागेल, असा सल्लाही दिला. तो एक प्रभावशाली खेळाडू आहे. तो जेव्हाही बोलतो तेव्हा अत्यंत शांत आणि संयमी असतो. तो मैदानात असताना नेहमीच आव्हानांना सामोरे जातो. त्यात क्रिकेटप्रति प्रचंड जोश आहे. त्यामुळे तो हिंदुस्थानी संघाचे नेतृत्व करताना रोहित शर्मा आणि विराट कोहलीचे मिश्रण ठरणार. कोहली हा नेहमीच आक्रमक राहिलाय. विराटने हिंदुस्थानी संघाचा चेहरामोहराच बदलून टाकलाय. त्यानेच गिलला या भूमिकेसाठी तयार केलेय. मात्र विराटच्या तुलनेत रोहित शर्मा थोडा वेगळा आहे. तो थोडा शांत आणि संयमी आहे, पण त्यात प्रचंड झुंजार वृत्ती असल्याचे बटलरने सांगितले. या दोन्ही दिग्गजांकडून गिलने खूप काही शिकलेय. खूप काही घेतलेय. त्यामुळे पहिल्या कसोटी मालिकेत तो मैदानात पूर्णपणे वेगळा दिसेल, असा विश्वासही बटलरने व्यक्त केला.

हिंदुस्थानी संघाचे कर्णधार म्हणजे देशातील चौथी प्रभावशाली व्यक्ती

बटलरने हिंदुस्थानी संघाचे नेतृत्व म्हणजे खूप मोठी जबाबदारी असल्याची बाब समोर आणली. हिंदुस्थानात क्रिकेटला धर्माचा दर्जा मानला जात असल्यामुळे जी व्यक्ती कसोटी संघाचे नेतृत्व करते ती देशातील तिसऱया किंवा चौथ्या क्रमांकाची प्रभावशाली व्यक्ती असल्यासारखेच आहे. गिलने आपले नेतृत्व आणि आपली फलंदाजी हे दोन्ही जबाबदाऱया वेगवेगळय़ा ठेवण्याची भूमिका घेतलीय. त्यामुळे जेव्हा तो फलंदाजीला असेल तेव्हा तो केवळ फलंदाजासारखा खेळू इच्छितो. त्यानंतर तो आपल्या नेतृत्व काैशल्यावर मेहनत घेणार आणि दोन्ही भूमिकांना वेगवेगळ्या पद्धतीने साकारण्याचा प्रयत्न करणार असल्याचीही माहिती बटलरने दिली. तसेच आपण हिंदुस्थानी क्रिकेटपटूंच्या स्टारडमला समजू शकत नाही. तुम्ही आयपीएलमध्ये खेळाडूंना आणि त्यांच्या लोकप्रियतेला पाहत असाल. तिथे ते वेगळे असतात, मात्र हिंदुस्थानी कसोटी संघाचे नेतृत्व ही एक वेगळी गोष्ट आहे. हे पद हिंदुस्थानच्या पंतप्रधानानंतर तिसरे किंवा चौथे प्रभावशाली पद आहे. त्यामुळे हे पद खूप महत्त्वाचे आणि जबाबदारीचे असल्याचे त्याने सांगितले.

हिंदुस्थानी नेतृत्वपदाबाबत गिल अजूनही अज्ञानी

हिंदुस्थानी संघाचे नेतृत्व नेमके काय असते, याची जाणीव अद्याप शुभमन गिलला झालेली नाही. तो परदेशातील खराब कामगिरीच्या सरासरीसह सिंहाच्या गुंफेत पाऊल ठेवण्याचे धाडस दाखवतोय. गिलने आपल्या नेतृत्वाची टोपी केवळ क्षेत्ररक्षण करतानाच घालावी. आपल्या फलंदाजीवर लक्ष द्यावे. ड्रेसिंग रूममध्ये सन्मान मिळवण्यासाठी गिलला धावा करणे गरजेचे असल्याचेही हिंदुस्थानचा माजी यष्टिरक्षक दिनेश कार्तिक म्हणाला.

Comments are closed.