‘अमंगल’वार! शेअर बाजार कोसळला

इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरल्याने हिंदुस्थानी शेअर बाजार मंगळवारी कोसळला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 212 अंकांनी घसरून 81,583 अंकांवर बंद झाला आहे, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 93 अंकांनी घसरून 24,853 अंकांवर स्थिरावला. आयटी सेक्टर सोडून बाकीचे सर्व सेक्टर्सच्या शेअर्सला झटका बसला. सर्वात जास्त घसरण फार्मा आणि हेल्थकेअरच्या शेअर्समध्ये दिसली. मेटल, बँकिंग आणि ऑटो सेक्टरमध्येही चांगली घसरण पाहायला मिळाली. मिडकॅप आणि स्मॉल कॅप शेअर्सही घसरले आहेत. सेन्सेक्समधील 30 पैकी 10 शेअर्स फायद्यात राहिले. यामध्ये टेक महिंद्रा, इन्फोसिस, एशियन पेंट्स, मारुती सुझुकी, टीसीएसचे शेअर्स वाढले, तर सन फार्मा, इटर्नल, टाटा मोटर्स, बजाज फायनान्स, इंडसइंड बँकेचे शेअर्स घसरले.
गुंतवणूकदारांचे 2.73 लाख कोटी स्वाहा
शेअर्समध्ये घसरण झाल्याने गुंतवणूकदारांना जबर फटका बसला. बीएसई लिस्टेड कंपन्यांचे एकूण मार्केट कॅपिटलायझेशन 447.79 लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आले. सोमवारी 450.52 लाख कोटी रुपयांवर हे मार्केट होते. याचाच अर्थ एका दिवसात गुंतवणूकदारांना 2.73 लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे.
Comments are closed.