मृतदेह नव्या कपड्यात गुंडाळण्यासाठी घेतली 2 हजारांची लाच, नवी मुंबई महापालिकेच्या वाशी रुग्णालयात संतापजनक प्रकार

मृतदेह नव्या कपड्यात गुंडाळून व्यवस्थित बांधून देण्यासाठी शवागृहात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने मृत तरुणीच्या नातेवाईकांकडून दोन हजार रुपयांची लाच घेतल्याचा संतापजनक प्रकार नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयात आज घडला. ही लाच घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हॉयरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यानंतर महापालिका प्रशासनाने दोन हजार रुपयांची लाच घेणाऱ्या या कर्मचाऱ्याला कामावरून तडकाफडकी बडतर्फ करून याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले. हा कर्मचारी कंत्राटी पद्धतीने शवागृहात काम करीत होता.

नंदिनी तिवारी (वय – 22) या तरुणीने ऐरोली येथील सेक्टर 1 मधील आपल्या घरी दोन दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही तरुणी मूळ उत्तर प्रदेश राज्यातील कानपूर येथील होती. ती नोकरीसाठी नवी मुंबईत आली होती. अपेक्षित पगार न मिळाल्यामुळे ती नाराज होती. यातूनच तिने दोन दिवसांपूर्वी घरात छताला गळफास लावून आत्महत्या केली. हा घटना समजल्यानंतर रबाळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयात पाठवला.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नंदिनी तिवारी हिचे नातेवाईक मंगळवारी नवी मुंबईत आले. तिचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी ते वाशी रुग्णालयाच्या शवागृहात गेले असता, तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली. मृतदेह परराज्यात घेऊन जायचा असल्याने नवीन कपड्यात व्यवस्थित गुंडाळून देतो, असे सांगून शवागृहातील कर्मचारी भास्कर धामणूसकर याने तिच्या नातेवाईकांकडून दोन हजार रुपये घेतले. ही लाच घेतानाचा व्हिडीओ एका नागरिकाने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हॉयरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली.

अधीक्षकांच्या गळ्यात घातला मांजरपाट

मृतदेह नवीन कपड्यात गुंडाळण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेतल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर संतप्त सामाजिक कार्यकर्त्यांनी आपला मोर्चा वाशी रुग्णालयाकडे वळवला. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश म्हात्रे यांच्या गळ्यात मृतदेह गुंडाळण्यासाठी लागणारे मांजरपाटाचे कापड घालून त्यांचा सत्कार केला. या प्रकारामुळे रुग्णालयाच्या परिसरात तणाव निर्माण झाला होता.

Comments are closed.