Devendra Fadnavis expressed his opinion for the first time on Sudhakar Badgujar BJP entry
ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आलेल्या सुधाकर बडगुजर यांच्या भाजपा प्रवेशाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, फडणवीसांना या पक्ष प्रवेशाबाबत स्पष्टीकरण देत बडगुजर यांनी भाजपाच्या नियमांनी वागावे, असे स्पष्टपणे म्हटले आहे.
पुणे : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले सुधाकर बडगुजर यांचा मंगळवारी (ता. 17 जून) भाजपामध्ये प्रवेश सोहळा पार पडला. या प्रवेशाआधी काही नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. कारण मंगळवारी सकाळी बडगुजर यांचा पक्ष प्रवेश होत असताना सकाळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी याबाबतची कोणतीच माहिती नसल्याचे प्रसार माध्यमांना सांगितले. पण दुपारी पार पडलेल्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाला दोन्ही नेते उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. पण या पक्ष प्रवेशाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणतीही प्रतिक्रिया न दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, फडणवीसांना या पक्ष प्रवेशाबाबत स्पष्टीकरण देत बडगुजर यांनी भाजपाच्या नियमांनी वागावे, असे स्पष्टपणे म्हटले आहे. (Devendra Fadnavis expressed his opinion for the first time on Sudhakar Badgujar BJP entry)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (ता. 18 जून) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना सुधाकर बडगुजर यांच्या पक्ष प्रवेशाबाबत विचारणा करण्यात आली. तेव्हा ते म्हणाले की, ही गोष्ट खरी आहे की, बडगुजर त्या बाजूला असताना त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. एक व्हिडिओ देखील आमच्या नितेश राणे यांनी रिलीज केला होता. पण, त्यानंतर आपल्याला याची कल्पना आहे की, जो गुन्हा दाखल झाला, त्या गुन्ह्याची पूर्ण चौकशी झाल्यानंतर चौकशीअंती त्यांच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही आणि ते शिवसेनेत असताना ते तेव्हा या पक्षात आले नव्हते. विधानसभा निवडणुकीच्या आधीच हे सगळं घडलेले आहे. विधानसभा निवडणुकीत आमच्याविरुद्धचे उमेदवार ते होते. शिवसेनेचे उमेदवार ते होते. आता निवडणुकीनंतर त्यांनी पक्षात येण्याची इच्छा दाखवली, असे फडणवीसांकडून सांगण्यात आले.
हेही वाचा… Devendra Fadnavis : भारतीय भाषांचा तिरस्कार करणे योग्य नाही, राज ठाकरेंना फडणवीसांचे प्रत्युत्तर
तसेच, बडगुजर यांनी देखील विधानसभा निवडणुकीत भरपूर मते घेतलेली आहेत. आपल्या पक्षात कोणी येत असेल तर आपण निश्चितपणे त्याचे स्वागत करतो. अर्थात अपेक्षा हीच असते की, त्यांचा जुना इतिहास काय असेल, वागण्याची पद्धत काय असेल, ते सर्व बाजूला ठेवून आता त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या निती नियमांनी वागले पाहिजे, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशावर स्पष्ट मत व्यक्त केले. तर, काल ज्यावेळेस पक्षप्रवेश ठरला, त्यावेळेस आम्ही ही जबाबदारी गिरीश महाजन यांच्यावर दिली होती. चंद्रशेखर बावनकुळे यांना त्या संदर्भात सकाळी कल्पना नव्हती की कालच प्रवेश आहे. नाशिकमध्ये बावनकुळे यांनीच सर्वांना समजावले होते की, आपल्याला का त्यांना प्रवेश द्यायचा आहे. बावनकुळे यांचा कुठेही पक्षप्रवेशाला विरोध नव्हता. ज्यावेळेस गिरीश महाजन यांनी सांगितले की, आजच प्रवेश ठरलेला आहे, त्यावेळेस बावनकुळे स्वतः पक्ष प्रवेशाला हजर होते. त्यामुळे मला असे वाटते की, हा फार तर कम्युनिकेशन गॅप असेल, पण विरोध कोणाचाही नव्हता. अनेक स्तरावर त्यांच्या पक्ष पक्षप्रवेशाला विरोध झाला. पण त्यांनाही आम्ही सांगितले की आपल्याला पक्ष वाढवायचा आहे, असेही यावेळी मुख्यंमत्री फडणवीसांकडून सांगण्यात आले.
Comments are closed.