छत्तीसगड-आंध्र सीमेवर ठार 3 नॅक्सल नेते
गजरला रवी याच्यासह चलपतीची पत्नी अरुणा चकमकीत ठार
वृत्तसंस्था/ रायपूर
छत्तीसगड आणि आंध्रप्रदेशच्या सीमेवर असलेल्या मरेदपल्ली येथे बुधवारी झालेल्या चकमकीत ग्रेहाउंड्स फोर्सने नक्षलवाद्यांचा केंद्रीय समिती सदस्य गजरला रवी, अरुणा यांच्यासह 3 बड्या नेत्यांचा खात्मा केला आहे. गजरलावर 40 लाखांचे बक्षीस होते. तर चकमकीत मारली गेलेली अरुणा ही नक्षलवादी नेता चलपतीची पत्नी आहे. तिच्या डोक्यावर 20 लाखांचे बक्षीस होते. आंध्रच्या अल्लुरी सीताराम जिह्यातील पोलीस अधीक्षक अमित बर्दार यांनी चकमकीची पुष्टी केली आहे. सध्या ही चकमक संपली असली तरी परिसरात दिवसभर शोधकार्य सुरू होते.
छत्तीसगड आणि आंध्रप्रदेशच्या सीमेवरील मरेदपल्लीमध्ये ग्रेहाउंड्स आणि नक्षलवाद्यांमध्ये बुधवारी चकमक झाली. या संघर्षात बड्या नेत्यांना यमसदनी पाठविण्यात आले असून सुरक्षा दलाला मिळालेले हे मोठे यश मानले जात आहे. ही चकमक छत्तीसगडमध्ये नक्षलवादाविरुद्ध सुरू असलेल्या व्यापक मोहिमेचा एक भाग असून त्याचे उद्दिष्ट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ठरवल्याप्रमाणे मार्च 2026 पर्यंत राज्य नक्षलमुक्त करण्याचे आहे.
10 फेब्रुवारी 2012 रोजी गजरला रवीने त्याच्या साथीदारांसह बीएसएफ पथकावर हल्ला केला. त्याने कमांडंटसह तीन सैनिकांना ठार मारत त्यांची शस्त्रs लुटली. तो 2014 पासून फरार होता आणि छत्तीसगडमध्ये सक्रिय होता. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, गजरला रवी हा नक्षलवाद्यांमध्ये गणेश उर्फ आनंद उर्फ उदय उर्फ गजरला रविंदर अशा अनेक नावांनी ओळखला जात होता. गजरलाच्या वडिलांचे नाव दिवंगत गजरला मल्लैया असे होते.
गजरला हा आंध्रप्रदेशातील वारंगल जिह्यातील वेलीशाला गावचा रहिवासी होता. तो केंद्रीय समितीचा सदस्य होता आणि सरकारने त्याच्यावर 40 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. यापूर्वी एका चकमकीत नक्षलवादी केंद्रीय समितीचा सदस्य सुधाकर उर्फ नर सिंहचलम हा विजापूरच्या राष्ट्रीय उद्यान परिसरात मारला गेला होता. सुधाकर हा तेलंगणा, छत्तीसगड आणि महाराष्ट्रात ‘वाँटेड’ होता. त्याच्यावर 1 कोटी रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. याशिवाय, सुरक्षा दलांनी 45 लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या नक्षलवादी भास्करलाही विजापूर जिह्यात झालेल्या चकमकीत ठार मारले. ही चकमक इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरात झाली होते.
Comments are closed.