राहुल गांधी आपल्या वाढदिवशी नवीन निवासस्थानाकडे जातात

आता नवीन पत्ता ‘लुटियन्स झोनमधील सुनहरी बाग’ : यापूर्वी सोनिया गांधींसमवेत वास्तव्य

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी त्यांच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त नवीन पत्त्यावर स्थलांतरित झाले. ते आता 5, सुनहरी बाग रोड येथील सरकारी निवासस्थानी राहतील. गेल्यावर्षी लोकसभेत विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्त झाल्यानंतर हा बंगला त्यांना देण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी राहुल गांधी औपचारिकपणे या नवीन निवासस्थानी स्थलांतरित झाले. सुरक्षेच्या आणि संसदीय व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून हे ठिकाण महत्त्वाचे असून ही श्रेणी फक्त वरिष्ठ राजकीय नेत्यांनाच दिली जाते. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा गुरुवारी 55 वा वाढदिवस होता. याचदरम्यान ते सुनहरी बाग रोडवरील टाईप-8 बंगल्यात स्थलांतरित झाले आहेत. हा बंगला त्यांना लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून देण्यात आला आहे.

संसदीय गृहनिर्माण समितीने त्यांना 5 सुनहरी बाग रोड, 7 मोतीलाल नेहरू मार्ग आणि 3 कृष्ण मेनन मार्ग बंगल्यांचा पर्याय दिला होता. यापैकी राहुल यांनी ‘सुनहरी बाग’ची निवड केली होती. यापूर्वी ते 10 जनपथ येथे सोनिया गांधींसोबत राहत होते. 2023 मध्ये त्यांनी एका प्रकरणातील शिक्षेनंतर खासदारपद गमावल्यामुळे 12 तुघलक लेन येथील बंगला रिकामा केला होता. हा बंगला 19 वर्षांपासून त्यांच्याकडे होता. परंतु न्यायालयीन निर्णयानंतर खासदारपद गमावल्यामुळे त्यांना बंगला रिकामा करावा लागला होता. 23 मार्च 2023 रोजी सुरत न्यायालयाने त्यांना मानहानीच्या खटल्यात 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. त्यानंतर 27 मार्च 2023 रोजी त्यांना बंगला रिकामा करण्याची नोटीस देण्यात आली.

पंतप्रधान मोदींकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

पंतप्रधान मोदींनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना त्यांच्या 55 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. ‘लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो, हीच माझी प्रार्थना’ असा संदेश पंतप्रधान मोदींनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिला आहे.

‘सुनहरी बाग’मधील वैशिष्ट्या

राहुल गांधी यांना मिळालेला ‘सुनहरी बाग’मधील बंगला लुटियन्स झोनमध्ये आहे. येथे देशातील अनेक मोठ्या राजकारणी, मंत्री आणि न्यायाधीशांचे बंगले आहेत. हा बंगला यापूर्वी वरिष्ठ कॅबिनेट मंत्री किंवा आयोग प्रमुखांना देण्यात आला होता. येथील परिसर उच्च सुरक्षा क्षेत्र आहे. बंगल्याचे क्षेत्रफळ सुमारे 2000 ते 3000 चौरस मीटर आहे. बंगल्यात 4 ते 5 मोठे बेडरूम आणि कार्यालये आहेत. येथे एक बैठक हॉल, खासगी लॉन, सुरक्षा कर्मचाऱ्यांची खोली, कर्मचारी निवासस्थान आणि कार पार्किंग देखील आहे. मोठ्या बैठका, मीडिया कॉन्फरन्स आणि राजकीय कार्यक्रमांसाठी पुरेशी जागा उपलब्ध असून विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधींच्या गरजेनुसार सर्व सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

Comments are closed.