MPL 2025: ईगल नाशिक टायटन्सने केलं टॉप, आरामदायक राहिली प्ले ऑफ्स पर्यंतची जर्नी
महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 ची लीग स्टेज गुरुवारी (19 जून) समाप्त झाली. त्यानंतर सहा संघांच्या या स्पर्धेत केवळ चार संघ उरले आहेत. प्ले ऑफ्समध्ये मजल मारणारे हे संघ अंतिम फेरीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतील. त्याचवेळी या साखळी फेरीत ईगल नाशिक टायटन्स संघाने पहिले स्थान मिळवले. त्यांचा हा प्रवास अत्यंत सहज झालेला दिसतो.
ईगल नाशिक टायटन्स हा एमपीएल इतिहासातील सर्वात सातत्यपूर्ण संघ म्हणता येईल. पहिल्या हंगामात तिसरे स्थान मिळवल्यानंतर दुसऱ्या हंगामात त्यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. यंदा साखळी फेरीत पहिले स्थान मिळवून, ते पुन्हा एकदा अंतिम फेरीत जाण्यासाठी प्रयत्न करतील. पावसाने खेळ केल्यास त्यांना विजेतेपद मिळवण्याची देखील संधी असेल.
ईगल नाशिक टायटन्सने आपल्या हंगामाची धमाकेदार सुरुवात केली होती. पहिल्या सामन्यात 94 धावांचा पाठलाग करताना, मंदार भंडारी याच्या नाबाद शतकाच्या जोरावर त्यांनी 8 गडी राखून विजय संपादन केला होता. सातारा वॉरियर्स विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला. मात्र विजयासाठी मिळालेले 54 धावांचे आव्हान त्यांनी 4.3 षटकात पूर्ण केले. त्यांचा हंगामातील तिसरा सामना पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाविरुद्ध होता. चार विकेट्सने हा सामना जिंकत त्यांनी विजयाची हॅट्ट्रिक केली.
पहिल्या तीन सामन्यात सहज विजय मिळवल्यानंतर चौथ्या सामन्यात पुणेरी बाप्पा संघाने त्यांना झुंजविले. मात्र, रोहन दामले याच्या नाबाद 80 धावांचा खेळीने त्यांनी चार गडी राखून विजयाचा चौकार पूर्ण केला. ईगल नाशिक टायटन्स संघाला हंगामातील आपली पहिली आणि एकमेव हार रायगड रॉयल्सविरुद्ध स्वीकारावी लागली. सिद्धेश वीर याच्या शतकामुळे रायगडने 216 अशी मोठी मजल मारलेली. या धावांचा पाठलाग करताना नाशिक संघाने दमदार फलंदाजी केली. मात्र, डकवर्थ लुईस नियमानुसार केवळ पाच धावांनी त्यांना पराभूत व्हावे लागले.
रायगडविरुद्धच्या पराभवातून ईगल नाशिक टायटन्स लगेच सावरले. पुढच्या सामन्यात सातारा वॉरियर्सला एकतर्फी सामन्यात पराभूत करून, प्ले ऑफ्समधील त्यांनी आपली जागा पक्की केली. यानंतर मात्र ईगल नाशिक टायटन्सला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यांचे अखेरचे चारही सामने पावसामुळे रद्द झाले. असे असले तरी त्या सामन्यांमध्ये प्रत्येकी एक गुण त्यांना मिळाला. एकूण 14 गुण घेत त्यांनी अव्वल स्थान कायम राखले.
प्ले ऑफ्समध्ये ईगल नाशिक टायटन्सकडे अंतिम फेरी गाठण्याची दोनदा संधी असेल. क्वालिफायर 1 मध्ये पराभूत झाले तरी क्वालिफायर 2 ते खेळू शकतात. तसेच, प्ले ऑफ्समधील सामने पावसामुळे रद्द झाले तर, साखळी फेरीत अव्वलस्थानी राहिल्यामुळे त्यांना थेट विजेतेपद देण्यात येईलदेण्यात येईल.
Comments are closed.