Global 54 भारतीय संस्था जागतिक क्रमवारीत चमकतात

आयआयटी दिल्ली भारतीय संस्थांमध्ये अव्वल : ‘टॉप टेन’मध्ये अमेरिकेचे वर्चस्व : क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 जाहीर

वृत्तसंस्था/नवी दिल्ली, न्यूयॉर्क

भारताच्या उच्च शिक्षण व्यवस्थेने जागतिक स्तरावर एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. भारतातील 54 संस्थांनी क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 मध्ये स्थान मिळवले आहे. यामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिल्ली (आयआयटी दिल्ली) देशातील सर्वोत्तम संस्था म्हणून उदयास आली आहे. आयआयटी दिल्लीला जागतिक पातळीवर 123 वे स्थान मिळाले आहे. या क्रमवारीत बहुतांश भारतीय संस्थांनी त्यांचे स्थान सुधारले असून हे भारताच्या शैक्षणिक प्रगतीचे लक्षण मानले जात आहे. जागतिक स्तरावर मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने (एमआयटी) सलग 14 व्या वर्षी अव्वल स्थान कायम ठेवले आहे.

जागतिक पातळीवरील शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांच्या क्रमवारीसंबंधीचा ‘क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026’ अहवाला नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी 100 हून अधिक देशांमधील 1,500 हून अधिक संस्था क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये समाविष्ट आहेत. या वर्षीही अमेरिकेने यादीत वर्चस्व कायम राखले आहे. क्यूएस युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये अमेरिका हा सर्वाधिक प्रतिनिधित्व करणारा देश राहिला असून या यादीत 192 अमेरिकन संस्थांचा समावेश आहे. तसेच आशियाई आणि युरोपीय देशांनी आपली उल्लेखनीय झेप अधोरेखित केली आहे.

भारताच्या बाबतीत विचार केल्यास ‘आयआयटी दिल्ली’ने यावर्षी चमकदार कामगिरी करत जागतिक क्रमवारीत 123 वे स्थान मिळवले आहे. ‘आयआयटी दिल्ली’ने मागील वर्षी म्हणजेच 2025 मध्ये 150 व्या क्रमांकावर आणि 2024 मध्ये 197 व्या क्रमांकावरून लक्षणीय सुधारणा केली आहे. ही भारतातील सर्वोच्च क्रमांकाची संस्था बनली आहे. संस्थेने अनेक प्रमुख निकषांवर उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आयआयटी दिल्ली नियोक्ता प्रतिष्ठेत जागतिक स्तरावर 50 व्या क्रमांकावर आहे. तर प्रत्येक विद्याशाखेच्या मानपत्र सूचीमध्ये 86 व्या क्रमांकावर आहे. तसेच शैक्षणिक प्रतिष्ठेत 142 व्या क्रमांकावर आहे. भारतातील खासगी संस्थांनीही जागतिक क्रमवारीत आपली उपस्थिती नोंदवली आहे. यामध्ये बिट्स पिलानी (668) आणि ओपी जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटी (851-900) सारख्या खासगी संस्थांनीही त्यांचे स्थान कायम ठेवले आहे किंवा त्यात सुधारणा केली आहे.

आयआयटी बॉम्बे 129 व्या क्रमांकावर

इतर भारतीय संस्थांनी क्यूएस वर्ल्ड रँकिंगमध्ये चांगली कामगिरी केली आहे. आयआयटी दिल्लीनंतर आयआयटी बॉम्बे यावर्षी 129 व्या क्रमांकावर आहे. त्यात गेल्यावर्षीच्या 118 व्या क्रमांकावरून थोडीशी घसरण झाली आहे. भारतीय संस्थांमध्ये सर्वात प्रभावी सुधारणा आयआयटी मद्रासने नोंदवली आहे. 2025 मध्ये आयआयटी मद्रासने 227 व्या स्थानावरून 180 व्या स्थानावर 47 स्थानांनी झेप घेतली. इतर प्रमुख भारतीय संस्थांमध्ये आयआयटी खरगपूर (215), आयआयएससी बेंगळूर (219) आणि दिल्ली विद्यापीठ (328) यांचा समावेश आहे.

भारतातील अव्वल शैक्षणिक संस्था

  • संस्था                         क्रमवारी
  • आयआयटी दिल्ली           123
  • आयआयटी बॉम्बे             129
  • आयआयटी मद्रास            180
  • आयआयटी खरगपूर         215
  • आयआयएससी बेंगळूर     219
  • दिल्ली विद्यापीठ              328

जगातील टॉप 10 विद्यापीठ

  • मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी)
  • इम्पीरियल कॉलेज लंडन
  • स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी
  • ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी
  • हार्वर्ड युनिव्हर्सिटी
  • केंब्रिज युनिव्हर्सिटी
  • ईटीएच झुरिच
  • नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर (एनयूएस)
  • युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (युसीएल)
  • कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी

Comments are closed.