सोनिया गांधी यांना रुग्णालयातून सोडण्यात आले
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना गुरुवारी दिल्लीच्या गंगाराम रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. पोटाच्या संसर्गामुळे त्यांना 15 जून रोजी वैद्यकीय तपासण्यांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता सोनिया गांधी यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून बाह्यरुग्ण तत्वावर उपचार सुरू राहतील, असे रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. अजय स्वरूप यांनी सांगितले. पंधरवड्यापूर्वीही सोनिया गांधी यांचा रक्तदाब अचानक वाढल्यामुळे त्यांना उपचारासाठी शिमला येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज (आयजीएमसी) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शिमलातील इस्पितळात त्यांची नियमित आरोग्य तपासणी केल्यानंतर काही वेळाने त्यांना घरी सोडण्यात आले होते. सुट्टी घालवण्यासाठी आपली मुलगी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांच्या छराबदा येथील खासगी निवासस्थानी वास्तव्यास असताना त्यांची प्रकृती बिघडली होती.
Comments are closed.