पंतप्रधान मोदी परदेशी दौर्यावरून परतले
पाच दिवसात 27 हजार किमी प्रवास : तीन देशांना भेट
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
पाच दिवसांचा परदेश दौरा पूर्ण करून पंतप्रधान मोदी गुरुवारी भारतात परतले. पंतप्रधान प्रथम 15-16 जून रोजी सायप्रसमध्ये राहिले. त्यानंतर 17 जून रोजी कॅनडाला पोहोचले, 18 जून रोजी जी-7 शिखर परिषदेत सहभागी झाल्यानंतर क्रोएशियाला गेले होते. पाच दिवसांच्या विदेश दौऱ्यात पंतप्रधानांनी तब्बल 27 हजार किलोमीटर इतका प्रवास केला.
पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात क्रोएशियाचे पंतप्रधान आंद्रेज प्लेनकोविक यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. कोणत्याही भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच क्रोएशिया दौरा ठरला आहे. येथे 17 हजारांहून अधिक भारतीय राहतात. क्रोएशियाची राजधानी झाग्रेबमध्ये पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी बुधवारी मंत्रपठण करण्यात आले.
तसेच भारतीय नृत्य सादर करून त्यांचे स्वागत करण्यात आले. क्रोएशियामध्ये पंतप्रधान मोदींनी भारतीय समुदायाच्या लोकांची भेट घेतली. भारत आणि क्रोएशिया लोकशाहीसारख्या मूल्यांशी जोडलेले आहेत. क्रोएशियाच्या पहिल्या भेटीत झालेल्या दमदार स्वागताबद्दल पंतप्रधान मोदी यांनी क्रोएशिया सरकार आणि पंतप्रधान आंद्रेज प्लेनकोविक यांचे आभार मानले. भारत आणि क्रोएशिया लोकशाही, कायदा आणि विविधता यासारख्या सामायिक मूल्यांनी जोडलेले असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधान मोदींनी काढले आहेत.
दोन्ही देशांमधील संरक्षण आणि डिजिटल भागीदारी वाढवण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. दोन्ही देशांनी द्विपक्षीय संबंध तिप्पट वेगाने वाढवण्याचा निर्णय घेतला. संरक्षण सहकार्य योजना, व्यापार, औषधनिर्माण, कृषी, आयटी, डिजिटल आणि स्वच्छ तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रात भागीदारी वाढवली जाईल, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी क्रोएशियामध्ये केले.
शैक्षणिक सहकार्य वाढवणार
भारत-क्रोएशिया यांच्यातील सांस्कृतिक आणि शैक्षणिक संबंध अधिक मजबूत करण्यावरही भर देण्यात आला आहे. पाच वर्षांचा सांस्कृतिक व्यवहार निश्चित करण्यात आला असून यासंबंधी लवकरच गतिशीलता करारावर स्वाक्षरी केली जाणार आहे. या भेटीमुळे भारत-क्रोएशिया भागीदारी आणखी मजबूत होईल आणि नवीन क्षेत्रात एकत्र काम करण्याचे मार्ग खुले होतील, असा दावाही पंतप्रधानांनी केला आहे.
Comments are closed.