MPL 2025: ईगल नाशिक टायटन्सची फायनलमध्ये धडक, सलग दुसऱ्या वर्षी मारली मजल
महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 चा पहिला क्वालिफायर सामना 20 जून रोजी खेळायला गेला. गुणतालिकेत पहिला दोन स्थानी राहिलेल्या ईगल नाशिक टायटन्स व पुणेरी बाप्पा यांच्या दरम्यान हा सामना झाला. ईगल नाशिक टायटन्सने साखळी पहिलीप्रमाणेच या सामन्यात देखील आपले वर्चस्व गाजवले. अर्धशतक झळकावणारा सलामीवीर मंदार भंडारी सामन्याचा मानकरी ठरला.
पावसाच्या सावटाखाली खेळल्या गेलेल्या या सामन्यात पुणेरी बाप्पा संघाला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. सलामीवीर यश नाहर 5 आणि मूर्तझा ट्रंकवाला 28 धावा करून माघारी परतले. त्यानंतर मधल्या फळीत तब्बल पाच फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. त्याचवेळी एका बाजूने ऋषिकेश सोनवणे याने संयमी मात्र जबाबदारीपूर्ण खेळ केला. बाद होण्यापूर्वी त्याने 52 चेंडूमध्ये 6 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 67 धावा केल्या. अखेरी सुरज शिंदे याने आक्रमक 22 धावा करून आपल्या संघाला 153 अशी सन्मानजनक मजल मारून दिली. ईगल नाशिक टायटन्स संघासाठी कर्णधार प्रशांत सोलंकी याने सर्वाधिक तीन बळी मिळवले. मुकेश चौधरी व अक्षय वायकर यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवत त्याला साथ दिली.
विजयासाठी मिळालेल्या 154 धावांचा पाठलाग करताना नाशिकसाठी मंदार भंडारी व अर्शिन कुलकर्णी ही जोडी मैदानात उतरली. दोघांनी 8.4 षटकात 69 धावा जोडताना संघाचा विजय जवळ आणला. अर्शिन बाद झाल्यावर साहिल पारख मैदानात उतरला. तोपर्यंत मंदार याने 40 चेंडूत 58 धावा करून हंगामातील दुसरे अर्धशतक झळकावले. अखेर साहिल याने नाबाद 38 व रणजीत निकम याने नाबाद 33 धावा करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. यासह सलग दुसऱ्या वर्षी ते अंतिम फेरीत पोहोचण्यात यशस्वी ठरले.
ईगल नाशिक टायटन्स आता रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात मैदानात उतरतील. हा सामना गहूंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सायंकाळी सात वाजता खेळला जाईल.
Comments are closed.