25 पासून चीनमध्ये एससीओ समिट होणार आहे

भारताच्यावतीने राजनाथ सिंह यांची उपस्थिती

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

25 ते 27 जूनदरम्यान चीनच्या किंगदाओ शहरात शांघाय सहकार्य संघटनेची (एससीओ) परिषद होणार आहे. संरक्षणमंत्र्यांच्या या बैठकीला भारताच्यावतीने राजनाथ सिंह उपस्थित राहणार आहेत. तर, पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. 7 वर्षांनंतर कोणत्याही भारतीय मंत्र्यांचा हा चीन दौरा असेल. यापूर्वी तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज एप्रिल 2018 मध्ये चीनला गेल्या होत्या.

राजनाथ सिंह आपल्या चीन दौऱ्यात चीनचे संरक्षणमंत्री अॅडमिरल डोंग जून यांचीही भेट घेत द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. यादरम्यान, व्हिसा धोरण, कैलास मानसरोवर यात्रा, पाण्याचा डेटा शेअर करणे आणि दोन्ही देशांमधील हवाई संपर्क पुनर्संचयित करणे यासारख्या मुद्यांवरही चर्चा होऊ शकते. दोन्ही नेत्यांची यापूर्वी लाओसमधील एडीएमएम-प्लस शिखर परिषदेत भेट झाली होती.

Comments are closed.