मॉडेलिंग हा अपघात, माझ्यासोबतचा प्रँक; देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं 90s चं सर्वात आवडतं गाणं
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फड्नाविस यांची मुंबईतील 5 प्रसिद्ध आर.जे. यांनी एका कार्यक्रमात मुलाखत घेतली. यावेळी, राजकारणविरहीत गप्पांनी मैफिल सजली होती. देवेंद्र फडणवीसांनी या मुलाखतीत आपल्या आवडी निवडी, मॉडेलिंग क्षेत्रात पडलेलं पाऊल, आवडते गाणे आणि लिखानाबद्दलही माहिती दिली. माझ्या मित्रांनी माझ्यासोबत केलेला तो प्रँक होता, पण तो चाललाही सुदैवाने मी वाचलो. मात्र, बरं झालं मी लवकरच त्यातून बाहेर पडलो. कुत्रा मनुष्याला चावला तर बातमी नाही होत. पण, माणूस कुत्र्याला चावला तर बातमी होते, माझं मॉडेलिंग म्हणजे ती झालेली माझी बातमी होती, असा किस्सा देवेंद्र फडणवीसांनी सांगितला. यावेळी, हिंदी सिनेमातलं आपलं आवडतं गाणं (Song) सांगताना देवेंद्र फडणवीसांनी अजय देवगण आणि तब्बू यांच्या सिनेमातील प्रसिद्ध गाण्याच्या ओळी म्हटल्या.
मला लिहिण्यासाठी आवडतं, पण मी कधी पब्लिकमध्ये लिहिले नाही. मी रामावर एक गाणे लिहिले, शंकरावर एक गाणे लिहिले आहे, एक अजून गाणे लिहिले आहे, ते तुम्ही शोधले तर सापडेल. मी सांगणार नाही, असे फडणवीसांनी म्हटले. मी रामदास आठवले घराण्याचा कवी आहे, तुम्ही आहात आर.जे, मला येत नाही फारसे, बाहेर लावले आरसे.. अशी आठवलेस्टाईल कविता मुख्यमंत्र्यांनी म्हणून दाखवली. तसेच, गाण्यांबद्दलही मुख्यमंत्री भरभरुन बोलले. गाणी आपल्यातील संवेदना जिवंत ठेवतात, आम्ही बाहेरून खडूस दिसतो पण आतून चांगले आहोत. आम्ही सर्व राजकीय व्यक्ती दररोज 10 रील्स बनवतो, त्यामुळे म्युजिक आम्हाला प्रमोट करते, असे म्हणत सोशल मीडियातील त्यांचं आकलन सांगितलं.
गाणी खूप लक्षात राहतात, पण मी सुरात गात नाही. त्यामुळे मी मोठ्याने गाणी लावतो आणि त्यात गातो. ज्यामुळे सूर चुकला तर कळत नाही, आम्ही कोरसवाले माणूस आहोत, असेही फडणवीसांनी म्हटलं. मला अमृतावर प्रेशर टाकून तिला म्हणावं लागेल की माझे गाणे म्हण, मी एक गाणे लिहिले आहे जे अमृता ने गायले आहे, ते तुम्ही शोधा असे फडणवीसांनी म्हटले.
मी त्याला वाटेत भेटलो …
आम्ही लव्ह मॅरेजवाले नाही, मला 90s ची गाणी आवडतात. राहों मे उनसे मुलाकात हो गई… हे माझं आवडतं गाणं आहे, असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले. मला असे वाटते की आपल्याला आवडते ते केले तर आपण थकत नाही. आशाताई या वयातही, 3 तास कार्यक्रम करू शकतात, तशा त्या 21 वर्षांच्या आहेत, कारण त्या गाणे जगतात. तसेच, आपल्याला आवडते ते काम करताना आम्ही देखील थकत नाही, असे म्हणत आवडते काम करण्याचा सल्लाच मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
हेही वाचा
बीड जिल्ह्यात भीषण अपघात; भरधाव वेगातील कारच्या धडकेत युवक ठार, 2 जखमी
आणखी वाचा
Comments are closed.