पीओपीच्या गणेशमूर्तींचे विसर्जन ओहोटीलाच होणार, समुद्रात प्रवेशासाठी अंतराची मर्यादा; सरकारला नियमावली सादर करणार

>> देवेंद्र भगत
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने या वर्षी प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या मूर्ती बनवण्यास आणि विक्रीस परवानगी दिली असली तरी पालिकेने मात्र राज्य सरकारच्या आदेशाचा दाखला देत या मूर्ती नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जित करण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे मोठय़ा गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा प्रश्न निर्माण होणार आहे. यावर उपाय म्हणून समुद्रात ओहोटी असताना मूर्ती विसर्जित कराव्यास आणि भरतीच्या वेळी त्या काठावर आल्यावर त्यांच्या विघटनासाठी प्रकिया राबवावी, अशी भूमिका बृहन्मुंबई गणेशोत्सव समितीने मांडली आहे. शिवाय समुद्री प्रदूषण टाळण्यासाठी समुद्रात ठराविक अंतरापर्यंत या मूर्ती विसर्जित कराव्यात, जेणेकरून त्या काठावर आल्यानंतर पुनर्प्रक्रिया करून वापर करता येईल, अशी भूमिकाही समन्वय समितीची आहे.
समुद्रासह जलस्रोतांमध्ये प्रदूषण वाढ होत असल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्ती तयार करण्यापासून विसर्जनापर्यंत वाद निर्माण होत आहेत. मात्र या वर्षी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानेच पीओपी मूर्ती बनवण्यास परवानगी दिल्याने मोठय़ा मूर्तिकारांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र मोठय़ा मूर्तींचे विसर्जन नैसर्गिक जलस्रोतांमध्ये करण्यास बंदी घातल्याने विसर्जनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला पीओपी मूर्तींच्या विसर्जनाबाबत सुविधा निश्चित अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार मुंबईतील मंडळांकडून, समन्वय समितीकडून सरकार सूचना मागवत आहे. यानुसार समन्वय समिती आपला अहवाल राज्य सरकारला लवकरच सादर करणार आहे.
- मुंबईत सुमारे 1 लाख 90 हजार घरगुती गणेशमूर्ती व 12 हजारांपेक्षा जास्त सार्वजनिक गणेशमूर्तीची नोंद आहे. यात 99.99 टक्के मूर्ती या पीओपी (प्लॅस्टर ऑफ पॅरिस) पासून बनवलेल्या असतात. या पीओपी मूर्तींचे समुद्र, खाडी, तलावात विसर्जन केल्याने प्रदूषण होते, असा आक्षेप आहे.
- त्यामुळे पालिकेकडून गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बनवले जातात. यामध्ये कृत्रिम तलाव संख्या – 168 , मूर्ती संकलन केंद्र – 170, फिरती विसर्जन स्थळे – 37 आणि प्रत्येक विभागात 8 ठिकाणी विसर्जन होणाऱया मूर्तींचे संकलन करण्याची व्यवस्था केली जाते. मुंबईत एकूण 70 नैसर्गिक विसर्जन स्थळे आहेत.
पीओपीच्या मूर्ती मोठय़ा असल्याने त्या नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जित करण्याची परवानगी मिळणे आवश्यक आहे. कारण मोठय़ा मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी होणाऱया लाखोंच्या गर्दीचे कृत्रिम तलावाच्या ठिकाणी नियोजन करणे अशक्य होणार आहे. त्यामुळे चेंगराचेंगरी होण्याचा धोका आहे. – नरेश दहिबावकर, अध्यक्ष, गणेशोत्सव समन्वय समिती
Comments are closed.