योगा दिवशी आंध्रामध्ये वर्ल्ड रेकॉर्ड्स
‘गिनीज बुक’मध्ये नोंद : मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली घोषणा
वृत्तसंस्था/ शाखापट्टणम
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी शनिवारी 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या समारंभाला ऐतिहासिक आणि यशस्वी असे संबोधत राज्याने दोन ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ बनवल्याचे सांगितले. ‘आरके बीच’ येथे एकाच ठिकाणी 3.03 लाख लोकांनी एकत्र योगा करून विश्वविक्रम रचला आहे. तथापि, सहभागींची नेमकी संख्या ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ प्राधिकरणाकडून जाहीर केली जाईल. तसेच अन्य एका घटनेत सुमारे 22,000 आदिवासी विद्यार्थ्यांनी एकाच ठिकाणी 108 मिनिटांत 108 सूर्यनमस्कार करून आणखी एक विश्वविक्रम रचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत योगाभ्यास केल्यानंतर माध्यमांशी बोलताना नायडू यांनी यासंबंधीची माहिती दिली.
11 वा आंतरराष्ट्रीय योग दिन हा एक भव्य कार्यक्रम होता. आपल्या राज्याने नवा इतिहास रचला आहे. राज्य सरकार आजच्या योग दिनासाठी सुमारे दोन कोटी नोंदणीची अपेक्षा करत होते, परंतु ही संख्या 2.45 कोटी झाली, असे मुख्यमंत्री म्हणाले. आंध्र प्रदेशात विशाखापट्टणममधील ‘आरके बीच’ येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री नायडू आणि इतर मान्यवरांनी योगा कार्यक्रमात सहभाग घेतला.
10 कोटींहून अधिक लोकांच्या सहभागासह 175 हून अधिक देशांमध्ये 12 लाखांहून अधिक ठिकाणी योग साजरा केला जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी येथील ‘आरके बीच’ येथे पंतप्रधान मोदींसोबत 11 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात भाग घेताना सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाला केवळ भारतातच नव्हे तर जगभरात लोकप्रिय केले आहे आणि ते जागतिक आरोग्य चळवळ बनवल्याचे ते पुढे म्हणाले.
पंतप्रधान मोदींचे आभार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाला केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर लोकप्रिय केले. त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय योग दिन सुरू करून योगाला जागतिक आरोग्य चळवळीत रूपांतरित केले. त्यांचा दूरदृष्टीपणा कौतुकास्पद असून मी त्यांचे विशेष आभार मानतो, असे नायडू म्हणाले. योग ही एक प्राचीन भारतीय पद्धत असून ती आता राष्ट्रीयत्व, प्रदेश, धर्म आणि भाषा विचारात न घेता सर्वांनी स्वीकारली आहे. योग शरीर, मन आणि आत्मा एकत्र करतो आणि आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचेही त्यांनी सांगितले.
Comments are closed.