अनधिकृत स्कूल व्हॅन पुन्हा रस्त्यावर, शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा ‘प्रश्न जैसे थे’; बस ओनर्स असोसिएशन हायकोर्टाचे लक्ष वेधणार

नवीन शैक्षणिक वर्षात शाळा सुरू होताच शाळकरी मुलांची ने-आण करण्यासाठी अनधिकृत स्कून व्हॅन पुन्हा रस्त्यावर धावू लागल्या आहेत. सुरक्षेचे विविध निकष धाब्यावर बसवून व्हॅन्स चालवल्या जात असल्याने शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ‘जैसे थे’ आहे. या पार्श्वभूमीवर स्कूल बस ओनर्स असोसिएशन अनधिकृत स्कूल व्हॅन्सच्या प्रश्नाकडे उच्च न्यायालयाचे लक्ष वेधणार आहे.

मुंबई शहर आणि उपनगरांत धावणाऱ्या वैध स्कूल बसच्या संख्येपेक्षा शाळकरी मुलांना घेऊन जाणाऱ्या अनधिकृत व्हॅन व खासगी वाहनांची संख्या अडीच पटीने वाढल्याचा दावा स्कूल बस ओनर्स असोसिएशनने केला आहे. स्कूल बससाठी सुरक्षा नियमावली आखलेली आहे. त्या नियमांचे लहान स्कूल व्हॅनकडून पालन केले जात नाही. या व्हॅन्समध्ये मुलांची काळजी घेण्यासाठी महिला सेवक नसतात. तसेच परवानगीपेक्षा जास्त मुलांना व्हॅनमध्ये कोंबून त्यांची वाहतूक केली जाते. वैध परवान्याच्या आधारे स्कूल बस चालवणारे कंत्राटदार मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी घेतात. अनधिकृत स्कूल व्हॅन्सकडून सुरक्षेची हमी दिली जात नाही, असा दावा असोसिएशनने केला आहे. लहान व्हॅन्समधून मुलांची केली जाणारी असुरक्षित वाहतूक यापूर्वी विविध फोटोंद्वारे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणलेली आहे. त्यावर पुढील आठवड्यात न्यायालय सरकारला कोणते निर्देश देतेय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारने 2018 पासून छोट्या स्कूल व्हॅन्सना परमिट देणे थांबवले आहे तरीही वैध परमिटशिवाय अनेक स्कूल व्हॅन्स मुंबईच्या रस्त्यावर धावताहेत. आरटीओ त्यांच्यावर कठोर कारवाई करीत नाही. त्यामुळे शाळकरी मुलांच्या नियमबाह्य आणि असुरक्षित वाहतुकीचा प्रश्न ‘जैसे थे’ आहे. न्यायालयाच्या आदेशाचे सरकारी यंत्रणांकडून पालन केले जात नाही. याकडे हायकोर्टाचे लक्ष वेधणार आहोत, असे स्कूल बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी सांगितले.

Comments are closed.