4 ते 6 जुलै दरम्यान आरएसएस बैठक

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) वार्षिक राष्ट्रीय स्तरावरील राज्य प्रचारक बैठक यावर्षी 4 ते 6 जुलै दरम्यान दिल्ली येथील कार्यालय ‘केशव कुंज’ येथे होणार आहे. या बैठकीला सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, डॉ. कृष्ण गोपाल यांच्यासह सर्व सह सरकार्यवाह, सर्व राष्ट्रीय स्तरावरील कार्य विभाग प्रमुख आणि इतर कार्यकारी परिषद सदस्य देखील उपस्थित राहतील. तसेच संघाशी संबंधित विविध संघटनांचे राष्ट्रीय स्तरावरील संघटन मंत्री देखील बैठकीला उपस्थित राहतील. पुढीलवर्षी संघाच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. यासंदर्भात ही बैठक खूप महत्त्वाची आहे. या बैठकीत सर्व प्रांत प्रचारक, सह प्रांत प्रचारक, क्षेत्र प्रचारक, सहक्षेत्र प्रचारक सहभागी होतील. संघाच्या संघटनात्मक रचनेनुसार देशात 11 प्रदेश आणि 46 प्रांत असून तेथील मुख्य प्रचारक बैठकीला उपस्थित राहणार आहेत. बैठकीच्या अजेंड्यात एप्रिल ते जून दरम्यान आयोजित प्रशिक्षण शिबिरांचे अहवाल आणि आढावा, पुढील वर्षी संघाच्या शताब्दी वर्षाच्या कार्यक्रमांची तयारी आणि इतर कार्यक्रमांचा समावेश आहे. संघ शताब्दी वर्षाचे कार्यक्रम विजयादशमीपासून सुरू होतील.

Comments are closed.