Ratnagiri News – बाळासाहेब खेर यांचे रत्नागिरीत स्मारक उभारा, शिवसेना उपनेते बाळ माने यांची मागणी

रत्नागिरीचे सुपुत्र आणि मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री पद्मविभूषण पुरस्कार विजेते कै.बाळासाहेब खेर यांचे महान कार्य प्रत्येक पिढीसाठी आदर्श आणि प्रेरणादायी ठरावे याकरीता रत्नागिरी शहरात कै.बाळासाहेब खेर यांचे स्मारक उभारावे अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आणि माजी आमदार बाळ माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

महाराष्ट्र आणि गुजरात यांचा समावेश असलेल्या ब्रिटिशकालीन मुंबई प्रांताचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान रत्नागिरीचे सुपुत्र कै.बाळासाहेब खेर यांना मिळाला.ते 1937 ते 1939 अशी दोन वर्ष मुख्यमंत्री होते. स्वातंत्र्यानंतरही पाच वर्ष पहिले मुख्यमंत्री होते. याच काळात त्यांनी शिक्षणमंत्री पद सांभाळले होते. महात्मा गांधीचा त्यांच्यावर प्रभाव होता. बाळासाहेब खेर यांनी मीठाच्या सत्याग्रहाच्या सविनय कायदेभंगाच्या मोहिमेत सहभाग घेतला होता. त्यावेळी त्यांना 13 महिन्याचा कारावास भोगावा लागला होता. 1942 च्या चलेजाव आंदोलनात त्यांनी सहभाग घेतल्याने त्यांना दोन वर्ष सक्षम कारावास भोगावा लागला. हा इतिहास उपनेते बाळ माने यांनी आपल्या निवेदनात मांडला आहे.

शारिरीक शिक्षण विषय सक्तीचा केला

कै.बाळासाहेब खेर यांनी शालेय शिक्षणात शारिरीक शिक्षण हा विषय सक्तीचा केला होता. हिंदुस्थानातील एकमेव महिला विद्यापीठाला कायदेशीर शासकीय मान्यता त्यांनी दिली होती. महाराजा सयाजीराव विद्यापीठ, महोद कर्नाटक विद्यापीठ, गुजरात विद्यापीठ अहमदाबाद, पुणे विद्यापीठ स्थापनेत त्यांचा सिंहाचा वाटा होता. महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात बाळासाहेब खेर यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची आठवण बाळ माने यांनी आपल्या निवेदनात केली आहे.

सर्वोदय छात्रालयाची स्थापना

कोकणचे गांधी कै.आप्पासाहेब पटवर्धन यांच्या सल्ल्यानुसार 1948 मध्ये बाळासाहेब खेर यांनी आपल्या मालमत्तेचा आईच्या नावाने ट्रस्ट करून त्यामार्फत सर्वोदय छात्रालयाची स्थापना केली होती. गेली 75 वर्ष हे सर्वोदय छात्रालय यशस्वीपणे सुरू असल्याचे उपनेते बाळ माने यांनी म्हटले आहे.

Comments are closed.