दिलीप वेंगसरकर कुठाय?

दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसापासून स्टार स्पोर्ट्स आणि जिओ-हॉटस्टारवर ‘लेजेंड्स आर मेड इन इंग्लंड’ ही चित्रफीत दाखवली जात आहे. आख्यायिका इंग्लंडमध्ये बनतात असं सांगणाऱ्या चित्रफितीमध्ये अगदी 1979 पासूनचे फलंदाज अन् त्यांचं कर्तृत्व मोठ्याच कौतुकाने दाखवलं जात आहे. गावसकर, तेंडुलकर, कपिल, विराट अशा अनेकानेक महान खेळाडूंच्या आख्यायिका पाहायला खूप मजा येतेय!

पण एक गोष्ट मात्र खटकली. या सर्व खुमासदार आख्यायिकांमध्ये आकर्षक फलंदाजी करणाऱ्या दिलीप वेंगसरकरचा समावेश नाहीये! त्याच दिमाखदार दिलीपची ही वाङ्मयीन आख्यायिका! वेंगसरकरने 1979 (103), 1982 (157) आणि 1986 (126*) अशा लागोपाठच्या इंग्लंड दौऱ्यावर लॉर्ड्सवर शतकांची झालर विणली होती. असा आजपर्यंत अबाधित असणारा पराक्रम करणारा तो एकमेव परदेशी फलंदाज आहे!

1986च्या लॉर्ड्स कसोटीत मिळालेल्या विजयात दिलीपच्या शतकाचा सिंहाचा वाट होता! लॉर्ड्सच्या मैदानावर दिलीपने 72.57 च्या सरासरीने 508 धावा दणकावल्या आहेत. 1995 साली जेव्हा आम्ही मुंबईच्या एकवीस पत्रकारांनी लॉर्ड्सच्या संग्रहालयाला भेट दिली तेव्हा बरोबर इंग्लंडचे कसोटीवीर रमण सुब्बाराव होते. आमचा फोटो काढताना ते म्हणाले होते, ‘डोन्ट से चीज, से वेंगसरकर’. दिलीप वेंगसरकर दादा फलंदाज होता. कदाचित, पुढच्या लॉर्ड्सच्या कसोटीदरम्यान दाखवल्या जाणाऱ्या चित्रफितीमध्ये दिलीपला मानवंदना देण्यात येईल.

Comments are closed.